ग्रामपंचायत कर्मचारी यूनियनचा बेमुदत कामबंदचा इशारा प्रलंबित मागण्या सोडविण्याची प्रशासनाकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या हक्काच्या मागण्यांबाबत शासन कोणताच निर्णय घेत नाही याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी यूनियन 21 ऑक्टोबरपासून अकोले पंचायत समिती समोर बेमुदत कामबंद व धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा यूनियनचे तालुकाध्यक्ष संदीप घोडके यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी यूनियन जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ढोकणे व सचिव दिलीप डिके यांच्या मार्गदर्शनानुसार शाखा अकोलेच्यावतीने तालुकाध्यक्ष संदीप घोडके, कार्याध्यक्ष संदीप वैद्य, सचिव संतोष नाईकवाडी, उपाध्यक्ष दौलत नवले, सह-सचिव साईनाथ झोळेकर यांनी शुक्रवारी (ता.8) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनकुसळे यांना निवेदन दिले. या निवेदनाच्या प्रती आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व पंचायत समितीचे सभापती यांनाही दिल्या आहेत.

आमच्या प्रलंबित मागण्यांबाबत 27 सप्टेंबर, 2021 रोजी निवेदन दिले होते. परंतु त्याबाबत कुठलेच आदेश पारीत झाल्याचे दिसून येत नाही. अतिशय कमी किमान वेतनात ग्रामपंचायत कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत असताना त्याचा मोबदला ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळत नाही ही खेदाची बाब आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रान्वये वाढीव किमान वेतन मिळावे, किमान वेतनातील फरक मिळावा, थकीत तसेच चालू राहणीमान भत्ता मिळावा, भविष्य निर्वाह निधी रक्कमेत ग्रामपंचायत हिस्सा जमा करावा, सेवा पुस्तक अद्ययावत करावे, सानुग्रह अनुदान व ड्रेस कोड दीपावली पूर्वी मिळावेत, सर्व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा विमा उतरविणे, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक यांच्यासमवेत बैठक आयोजित करणे या व अन्य मागण्याचा येत्या 8 दिवसांत योग्य तो निर्णय न घेतल्यास गुरुवार दिनांक 21 ऑक्टोबर, 2021 पासून सकाळी 11 वाजता अकोले पंचायत समिती समोर बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Visits: 95 Today: 1 Total: 1100512

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *