कसायांना गोवंश विकणार्‍यांनाही सहआरोपी करा! सततच्या कारवायांमुळे संगमनेरची बदनामी; मुस्लिम समाजाचे निवेदन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखाने आणि त्यावर सातत्याने होणार्‍या कारवायांमुळे संगमनेरची राज्यभर बदनामी होत आहे. पोलिसांनी आजवरच्या कारवायांत केवळ कसायांनाच आरोपी केले असून त्यांना जनावरांचा पुरवठा करणार्‍या व्यापार्‍यांसह दलाल आणि खेडोपाडी जनावरे विकणार्‍या शेतकर्‍यांना सुद्धा या गुन्ह्यांमध्ये सहआरोपी करावे व संगमनेरातील कत्तलखाने कायमस्वरुपी बंद करुन संगमनेरची बदनामी थांबवावी यासाठी समस्त मुस्लिम समाजानेच आता पुढाकार घेतला असून सुमारे शंभरावर नागरिकांनी मंगळवारी प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांची भेट घेवून त्यांना कारवाईबाबत निवेदन सोपविले आहे.

गेल्या शनिवारी (ता.2) संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावर असलेल्या जमजम कॉलनी परिसरातील पाच साखळी कत्तलखान्यांवर श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्त्वाखालील पोलिस पथकाने छापा घालीत कारवाई केली होती. या कारवाईत मोठ्या प्रमाणात कापलेले आणि जिवंत गोवंश हाती लागल्याने सदरची कारवाई राज्यातील आजवरची सर्वात मोठी ठरली होती. त्यातच या कारवाई दरम्यान कत्तलखान्यांच्या अंतरंगातील रक्तरंजीत छायाचित्रे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने राज्यभरातून त्याचे पडसाद उमटू लागले. संगमनेरातील गोप्रेमी नागरिकांनीही या विरोधात आंदोलन सुरु केल्याने व त्याबाबतचे वृत्त स्थानिकपासून ते राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांमध्ये झळकल्याने संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांची चर्चा राज्यभर पसरली.

या सर्व घडामोडींमुळे अस्वस्थ झालेल्या मुस्लिम समाजाने तातडीने बैठक घेवून असे सर्व बेकायदा उद्योग बंद व्हावेत यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुस्लिम समाजातील शंभरावर ज्येष्ठ, श्रेष्ठ नागरिकांनी मंगळवारी (ता.5) प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांची भेट घेवून समाजाच्यावतीने त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सोपविले. या निवेदनात म्हंटले आहे की, संगमनेर शहरात होणार्‍या बेकायदा गोवंश जनावरांच्या बेकायदेशीर कत्तल व संबंधित कत्तलखान्यांवर होणार्‍या सततच्या कारवाया यामुळे संगमनेर शहराचे नाव राज्यभर बदनाम होत आहे. वारंवार कारवाया होवूनही येथील कत्तलखाने बंद होत नाहीत. कारण पोलिस प्रशासन कारवाई करतांना केवळ कापलेल्या जनावरांचे मांस व जिवंत जनावरे ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्यावरच कारवाई करतात.

परंतु, संबंधित कसाई ज्या व्यापार्‍यांकडून गोवंश खरेदी करतात, जे दलाल सदरचे गोवंश जनावरे कत्तलखान्यांपर्यंत पोहोचवतात व खेडोपाडी जे शेतकरी आपल्या दावणीची जनावरे कत्तलीसाठी गोवंशाच्या व्यापार्‍यांना विकतात हे सर्व घटक कायद्याने दोषी आहेत. गेल्या सोमवारी संगमनेरात झालेली कारवाई आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. याबाबत सात जणांवर संगमनेर पोलिसांनी गुन्हेही दाखल केले आहेत. परंतु ही कारवाई करतांना संबंधित कत्तलखान्यांपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरे कशी आली? कारवाई झालेल्या कत्तलखाना मालकांना ती कोणी विकली? याची सुद्ध सखोल चौकशी होण्याची व या साखळीत सहभागी असलेल्या सर्वावर ‘त्या’ कसायांसह सहआरोपी करण्याची गरज या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. मुस्लिम समाज अशा प्रकारच्या बेकायदा व्यवसायांच्या विरोधात असून पोलिस व प्रशासनाने कारवाई करतांना केवळ कसायांना लक्ष्य न करता या प्रक्रीयेत ज्यांचा सहभाग आहे त्या प्रत्येकावर कारवाई करावी अशी मागणीही या निवेदनाद्वारे प्रांताधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

प्रत्येक समाजात अवैध व्यवसायाच्या माध्यमातून माया कमवणार्‍यांची संख्या असते. तशी ती मुस्लिम समाजातही आहे. मात्र त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच अशा व्यवसायात लुप्त असल्याचा आरोप करणे अयोग्य आहे. या निवेदनातून मुस्लिम समाजाच्या भावनाही प्रखरपणे समोर आल्या असून संगमनेरातील कत्तलखाने कायमस्वरुपी बंद करायचे असतील तर केवळ एकाच घटकावर नव्हेतर संपूर्ण साखळीवरच कारवाई करण्याची गरजही त्यातून स्पष्टपणे समोर आली आहे. त्यांच्या या निवेदनावर प्रांताधिकारी काय कारवाई करतात हे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 117107

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *