विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार! संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल; शहरात उडाली खळबळ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बलात्कारांच्या घटनांनी राज्य हादरलेले असताना संगमनेरातही असाच प्रकार उघडकीस आला आहे. विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून 2017 ते 2021 पर्यंत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित महिला ही एकटीच शहरात वास्तव्यास आहे. वेणूनाथ वामन ठोंबरे (वय 58, रा. इंदिरानगर) याने पीडित महिला विधवा असल्याची माहिती झाल्याने त्याने माझी पत्नी आजारी असल्याने तिच्या इच्छेनुसार दुसर्या लग्नाचे आमिष दाखवले. लग्न झाल्यानंतर तुला देखील जोडीदार मिळेल आणि तिची सेवा करता येईल. असा विश्वास संपादन करुन आणि वारंवार लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर 2017 ते 10 मे, 2021 पर्यंत अत्याचार केला. परंतु, अचानक आरोपी ठोंबरे याने लग्नास नकार दिला आणि पत्नी देखील आजारी नसल्याचे उघड झाल्याने फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. यामुळे पीडित महिलेने शहर पोलिसांत धाव घेत संपूर्ण आपबिती कथन केली.
या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वेणूनाथ वामन ठोंबरे याच्या विरोधात गुरनं.503/2021 भादंवि कलम 376, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षिका योगिता कोकाटे ह्या करत आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.