अवघड परिस्थितीत लोकप्रतिनिधी नेमके काय करतात? ः पिचड
अवघड परिस्थितीत लोकप्रतिनिधी नेमके काय करतात? ः पिचड
कोरोना संकटातील उपाययोजनांबाबत आमदार लहामटेंवर साधला निशाणा
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, ऑक्सिजन, औषधे, किट यांचा तुटवडा आहे. या सर्व अवघड परिस्थितीत तालुक्याचे लोकप्रतिनिधी नेमके काय करतात, त्यांनी आता बाहेर पडावे, असे आवाहन भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी आमदार डॉ.किरण लहामटे यांना केले आहे.

पिचड म्हणाले की, दोन दिवसांपासून रॅपिड टेस्ट किट उपलब्ध नाही. पूर्वी याठिकाणी कार्डियाक रुग्णवाहिका होत्या. त्याही दुसरीकडे हलविल्या आहेत. ज्या 102, 108 धावतीत, त्यामध्ये सुविधा नाहीत. शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने राबविण्यासाठी योग्य ती पावलं उचलावी लागतात व त्यात लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. याठिकाणी नक्कीच काही तांत्रिक सुविधांचा अभाव राहिला, परंतु आज महामारीच्या काळात कर्मचारी वर्ग कमी झाला व यंत्रणाही ढासळली गेली आहे, असा आरोप पिचड यांनी केला.

दरम्यान, खानापूर हे उपचार केंद्र नसून केवळ रुग्णांना दाखल करणे, एव्हढेच काम तेथे होत आहे. तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या गतीने वाढत आहे. सरकार व प्रशासन याबाबत कमी पडत आहे, या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अकोले व्यापारी संघटनेने आजपासून (ता.14) आठ दिवस जनता संचारबंदी लागू करून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर राजूर येथेही रुग्ण वाढू लागल्यामुळे तेथेही बुधवारपासून (ता.16) 23 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

