आजही वाढले तालुक्यातील कोविड बाधित रुग्ण! शहरातील केवळ एकासह तालुक्यातील सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह..
नायक वृत्तसेवा संगमनेर
संगमनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याची शृंखला सुरू असली तरीही शनिवारपासून त्यात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. शनिवारी सकाळी 5 तर सायंकाळी चौतीस रुग्ण समोर आले होते. त्यामुळे संगमनेर तालुक्याने कालच बाधितांचे तेविसावे शतक ओलांडले होते. आता त्यात आजही पुन्हा 16 रुग्णांची भर पडली आहे. मात्र दररोजच्या सरासरीपेक्षा आजच्या रुग्ण संख्येतही मोठी घट झाल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज तालुक्याच्या रुग्ण संख्येत 16 रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या 2 हजार 321 वर पोहोचले आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेकडून व रॅपिड अँटीजेन चाचणीतून केवळ प्रत्येकी एक रुग्ण समोर आला असून 14 रुग्ण खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आले आहेत. शहरातील गोविंदनगर परिसरातील 43 वर्षीय तरुणाला संक्रमण झाले असून आज प्राप्त झालेल्या उर्वरित अहवालातील सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यात पिंपळने येथील 70 वर्षीय महिला रॅपिड अँटीजेन चाचणीतून बाधित असल्याचे समोर आले असून निमगावजाळीतील 42 वर्षीय तरुण पॉझिटिव्ह असल्याचे शासकीय प्रयोगशाळेने कळविले आहे.
याशिवाय खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून तालुक्यातील निमगाव टेंभी येथील 34 वर्षीय तरुण, निमोण येथील 48 वर्षीय इसम, मनोली येथील 70 वर्षीय व 55 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 64 वर्षीय महिला, निळवंडे येथील 56 व 53 वर्षीय इसम, वनकुटे येथील 75 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, कौठे बुद्रुक येथील 46 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 42 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 54 वर्षीय इसम व मंगळापुर येथील 23 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आल्याने तालुक्याच्या रुग्ण संख्येत आज सोळा रुग्णांची भर पडून तालुक्यातील बाधितांची संख्या 2 हजार 321 वर पोहोचली आहे.
गेल्या 26 ऑगस्टपासून संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या तारखेपासून तर तालुक्याची रुग्णसंख्या दररोज नवनवीन विक्रम नोंदवित आहे. गेल्या एक तारखेपासून आज वरचा विचार करता तालुक्याच्या रूग्णसंख्येत तब्बल 601 रुग्णांची भर पडली असून 9 जणांचा बळीही गेला आहे. त्यामुळे या महिन्यात तालुक्याची रुग्णसंख्या तिसरे सहस्त्रक ओलांडून पुढे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून नागरिकांनी स्वयं शिस्तीचे व नियमांचे पालन करणे अनिवार्य बनले आहे.