कोविड संक्रमणातून संगमनेरात आणखी एकाचा मृत्यू!

कोविड संक्रमणातून संगमनेरात आणखी एकाचा मृत्यू!
तालुक्याच्या रुग्णसंख्येत भल्या सकाळीच पडली आणखी पाच रुग्णांची भर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शुक्रवारी रात्री रोजच्या तुलनेत कमी रुग्णसंख्या समोर आल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र त्याचवेळी तालुक्यातील आणखी एका नागरिकाचा बळी गेल्याचे वेदनादायी वृत्त आल्याने हा दिलासा क्षणाचा ठरला. गेल्या 1 नोव्हेंबरपासूनचा तालुक्यातील हा नववा तर एकूण पस्तीसावा कोविड बळी ठरला. शासन दरबारी मात्र या मृत्यूसह अद्यापही 31 जणांची अधिकृत नोंद आहे. या सोबतच आज सकाळी खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून ग्रामीण भागातील पाच जण संक्रमित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज सकाळी संगमनेर तालुक्याच्या बाधित संख्येत भर पडून ती आता 2 हजार 271 वर पोहोचली आहे.


गेल्या 5 सप्टेंबर रोजी तालुक्यातील हिवरगाव पठार येथील 55 वर्षीय इसमाचा स्त्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांचा कोविडशी संघर्ष थोटा पडला आणि त्यांचा या संघर्षात बळी गेला. गेल्या 1 सप्टेंबरपासून आजवर गेलेला हा नववा तर आत्तापर्यंतचा पस्तीसावा कोविड बळी ठरला आहे.

गेल्या कालावधीत मृत्यू झालेल्यांपैकी चौघे अन्य जिल्ह्यांत उपचार घेताना मृत्यू पावलेले आहेत. त्यामुळे प्रशासकीय रचनेनुसार त्या-त्या जिल्ह्यांत प्रशासनाकडून त्या रुग्णाच्या कोविड मृत्यूबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची नोंद संगमनेरच्या मृत्यूत गणली जाईल, असे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांचे म्हणणे आहे.


यावेळी वेदनादायी वृत्तासह संगमनेरकरांना आज सकाळी पुन्हा एक झटका बसला आहे. रात्री उशिराने खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात ग्रामीण भागातील आणखी पाच जणांना कोविडचे संक्रमण झालेले आहे. त्यात शहरालगतच्या गुंजाळवाडीतील 37 वर्षीय तरुण, ढोलेवाडीतील 48 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 75 वर्षीय वृद्ध महिला तर कौठे बुद्रूकमधील 62 मधील वृद्धासह 55 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रात्री उशिराने प्राप्त झालेल्या अहवालाने आज सकाळी तालुक्याच्या रुग्णसंख्येत भर पडून बाधितांचा आकडा तेविसाव्या शतकाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे जात 2 हजार 271 वर पोहोचला आहे. तर कोविडने शासकीय नोंदीनुसार तालुक्यातील 31 जणांचा तर विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्यानुसार एकूण 35 जणांचा कोविडने बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील आणि त्यातही ग्रामीण क्षेत्रातील अनेक गावांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने तालुक्याची अवस्था गंभीर होत चालली असल्याने प्रत्येक नागरिकाने शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा संगमनेर तालुक्यातील कोविडची अवस्था भयंकर होण्यास आपणच कारणीभूत ठरु शकतो.

गेल्या एप्रिलपासून सुरु झालेल्या कोविडच्या संक्रमणावर एका नजरेत दृष्टीक्षेप टाकल्यास एप्रिलमध्ये ग्रामीण भागातील एकासह आठ रुग्ण, मे महिन्यात पाच जणांच्या मृत्यूसह ग्रामीण रुग्णसंख्येत 21 तर शहरी रुग्णसंख्येत 15 रुग्णांची वाढ, जूनमध्ये सहा जणांच्या मृत्यूसह ग्रामीण भागातील 23 तर शहरी भागातील 42 जणांना संक्रमण, जुलैमध्ये सात जणांच्या मृत्यूसोबतच ग्रामीण भागात 381 तर शहरी भागात 269 रुग्णांची वाढ, ऑगस्टमध्ये सात मृत्यूसह ग्रामीण भागात 603 तर शहरी भागात 358 रुग्णांची भर व चालू महिन्यातील अवघ्या दहा दिवसांतच नऊ जणांच्या मृत्यूसह तालुक्याच्या ग्रामीण भागातील 127 गावांमध्ये प्रादुर्भाव पसरण्यासोबतच ग्रामीण रुग्णसंख्येत 429 तर शहरी रुग्णसंख्येत 97 अशा सरासरी प्रती दिवस 52 रुग्ण या दराने संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 526 रुग्णांची भर पडली आहे. रुग्णवाढीचा हा वेग कायम राहिल्यास या महिन्यात रुग्णवाढीचे तिसरे सहस्रकही मागे सुटण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Visits: 48 Today: 1 Total: 420247

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *