संगमनेरात ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ नामदेव जाधवांचे स्मारक उभारणार ः तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दुसर्या महायुद्धामध्ये इटलीमधील सिनोई नदीच्या काठावर जर्मन सैन्याची दाणादाण उडवून आपल्या सहकार्यांचे प्राण वाचवून अतुलनीय शौर्य गाजवणारे संगमनेरचे भूषण व निमज जन्मभूमी असलेल्या ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ नामदेव जाधव यांचे संगमनेर शहरात स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, संगमनेर तालुक्याला व शहराला थोर भूमिपुत्रांची परंपरा लाभली असून स्वर्गीय नामदेव जाधव हे संगमनेर व अकोले तालुक्याचे भूषण आहे. निमज येथे जन्मलेल्या नामदेव जाधव यांनी दुसर्या महायुद्धामध्ये इटलीमधील सिनोई नदीच्या काठावर जर्मन सैन्याची दाणादाण उडवून आपल्या 100 सहकार्यांचे प्राण वाचून अतुलनीय शौर्य गाजवले होते. त्यांचे शौर्य आणि पराक्रम पाहून ब्रिटिशांनी त्यांना इंग्लंडचा सर्वोच्च सन्मान ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ प्रदान केला होता. इंग्लंडमधील म्युझियममध्येही त्यांचा पुतळा ठेवण्यात आला असून इटलीमधील सिनोई नदीच्या काठावर जेथे हा रणसंग्राम झाला तेथे सुद्धा त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. मराठा रेजिमेंट ट्रेनिंग सेंटर बेळगाव येथे सुद्धा त्यांचे स्मारक उभारण्यात आले असून आपल्या अकोले तालुक्यातील वीरगाव येथेही त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. संगमनेर व अकोले तालुक्याच्या भूमिपुत्रांची यशोगाथा ही या जिल्ह्यासाठी प्रेरणादायी असून येणार्या पिढीला त्यांच्या पराक्रम व अभूतपूर्व शौर्याची माहिती व्हावी यासाठी संगमनेर नगरपालिकेच्यावतीने स्मारक उभारण्यात येणार आहे.

