पाऊस मंदावल्याने भंडारदरा व निळवंडे धरणाचे सांडवे बंद! अवघ्या 72 तासांत जायकवाडीत साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाणी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील चार दिवसांपासून मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोटात सुरु असलेला पावसाचा झंझावात पूर्णतः ओसरल्याने धरणात होणारी पाण्याची आवकही थंडावली आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने भंडारदर्याच्या सांडव्याद्वारे होणारा विसर्ग थांबवला असून केवळ विद्युतगृहासाठी पाणी सोडले जात आहे. भंडारदर्यातून येणारे पाणी थांबल्याने आज सकाळपासून निळवंडे धरणाच्या सांडव्याचे दारही बंद करण्यात आले असून धरणातून अवघे 685 क्युसेक्स पाणी सोडले जात असल्याने गेल्या दोन दिवसांत फुगलेले प्रवरा नदीचे पात्र आता ओसरु लागले आहे. मात्र नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात झालेल्या तुफानी पावसाने गोदावरीसह उर्ध्वभागातील नद्यांमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने मागील 72 तासांत जायकवाडी धरणात तब्बल साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे, त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांवरील ‘समन्यायी’ची टांगती तलवारही हटल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
दीर्घकाळ ओढ देणार्या वरुणराजाचे गेल्या 8 सप्टेंबर रोजी मोठ्या धरणांच्या पाणलोटासह जिल्ह्यात सर्वदूर पुनरागमन झाले. शनिवारी (ता.11) पाणलोटातील पावसाचा जोर वाढल्याने 15 ऑगस्टचा मुहूर्त टळलेला भंडारदरा जलाशय रविवारी (ता.12) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तुडूंब झाले. त्यामुळे धरणातून सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. महिन्याभराच्या विलंबाने भंडारदरा भरल्याने व त्यातच पाऊसही सुरु असल्याने निळवंडे धरणातील पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे अवघ्या चोवीस तासांतच निळवंड्याने नव्वदीचा आकडा ओलांडल्याने सोमवारी सकाळपासूनच प्रवरेला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानुसार दुपारी पावणदोनच्या सुमारास धरणातून 3 हजार 3360 व त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होवून 30 हजार 28 क्युसेक्सपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला होता. त्यामुळे मागील दोन दिवस प्रवरानदीला मोठा पूरही आला.
गेल्या शनिवारपासून सुरु झालेल्या पावसाच्या झंझावाताने जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे ही तीनही धरणं पूर्ण क्षमतेच्या जवळपास पोहोचल्याने धरणांची सुरक्षितता म्हणून भंडारदरा व निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. त्यासोबतच या कालावधीत नाशिक जिल्ह्यातही तुफान पाऊस झाल्याने गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले. त्याचा परिणाम गोदावरी, प्रवरा व मुळा या नद्यांमधून जायकवाडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाण्याची जावक झाली. त्यामुळे गेल्या शनिवारी (ता.11) 66.09 टक्के भरलेल्या जायकवाडीचा एकूण पाणीसाठा आज सकाळी सहा वाजता 72.60 टक्क्यांवर पोहोचला. तर समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार 15 ऑक्टोबर रोजी जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के असणे आवश्यक असल्याने, मागील 72 तासांतील पावसाने तो 63.29 टक्क्यांवर नेल्याने नाशिक व नगर जिल्ह्यावरील पाणी सोडण्याचे संकट काहीसे धुसर दिसू लागले आहे.
जिल्ह्यातील मोठ्या धरणांसह आढळा व भोजापूर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातही या कालावधीत समाधानकारक पाऊस झाल्याने 72 तासांपूर्वी चिंताक्रांत असलेल्या या दोन्ही जलाशयांच्या पाणीसाठ्यातही दिलासादायक भर पडली. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंद दाटला असून आढळा धरण भरण्याच्या अपेक्षा पुन्हा एकदा जिवंत झाल्या आहेत. या हंगामात पहिल्यांदाच गेल्या चोवीस तासांत आढळा धरणात उच्चांकी 107 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाल्याने धरणाचा एकूण जलसाठा आता 76.60 टक्क्यांवर गेला आहे, तर भोजापूर जलाशयातही 30 दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ होवून पाणीसाठा 40.44 टक्के झाला आहे. पुढील काही दिवस या परिसरात पाऊस झाल्यास ही दोन्ही धरणं भरण्याचा आशाही जागल्या आहेत.
आज सकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासांत पाणलोटातील रतनवाडी येथे 49 मिलीमीटर, घाटघर 30 मिलीमीटर, पांजरे 30 मिलीमीटर, भंडारदरा 19 मिलीमीटर, वाकी 17 मिलीमीटर, निळवंडे 01 मिलीमीटर व संगमनेर तालुक्यात दोन मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी मुळा धरणाचा एकूण पाणीसाठा 24 हजार 731 दशलक्ष घनफूट (95.11 टक्के), भंडारदरा धरण (ओव्हर फ्लो), निळवंडे 7 हजार 890 दशलक्ष घनफूट (94.83 टक्के), आढळा 812 दशलक्ष घनफूट (76.60 टक्के), भोजापूर 146 दशलक्ष घनफूट (40.44 टक्के) व जायकवाडी धरण (एकूण) 74 हजार 589 दशलक्ष घनफूट (72.60 टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा 48 हजार 520 दशलक्ष घनफूट (63.29 टक्के) इतका झाला आहे. सध्या भंडारदरा धरणातून 816 क्युसेक्स, निळवंडे धरणातून 685 क्युसेक्स, वाकी जलाशयावरुन 789 क्युसेक्स, मुळा धरणातून 1 हजार 75 क्युसेक्स व कोतुळ नजीकच्या मुळा नदीपात्रातून 4 हजार 227 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह सुरु आहे.
राज्य विधीमंडळात 2005 साली संमत झालेल्या समन्यायी पाणी वाटपाच्या सूत्रानुसार 15 ऑक्टोबर रोजी गोदावरी उर्ध्वभागातील सर्व धरणांतील पाण्याची मोजदाद केली जाते. त्यावेळी जायकवाडी जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्क्यांहून अधिक असणे आवश्यक आहे. अन्यथा वरील भागातील धरणांमधून जलायकवाडीची शिल्लक राहिलेली पाण्याची तुट भरुन काढावी लागते. यापूर्वी चारवेळा या कायद्यान्वये भंडारदरा व मुळा धरणातून जायकवाडीत पाणी सोडले गेले आहे. यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र मागील 72 तासांत नगर व नाशिक जिल्ह्यातील गोदावरीसह उर्ध्व भागात झालेल्या दमदार पावसाने या दोन्ही जिल्ह्यांवरील समन्यायीचे संकट टळल्याचे मानले जात आहे.