समशेरपूर ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार? सामाजिक कार्यकर्त्या शीतल भाबड यांचा पुराव्यानिशी आरोप

नायक वृत्तसेवा, अकोले
आढळा खोर्‍यातील राजकीयदृष्ट्या अग्रेसर असणार्‍या समशेरपूर ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या शीतल भाबड यांनी हा भांडाफोड करुन पुरावे सादर करुन स्थानिक पदाधिकार्‍यांवर निशाणा साधला आहे. यामुळे अकोले तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या शीतल भाबड यांनी दिलेल्या पुराव्यांत म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन 2020-21 मध्ये गावात चार कामे करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. परंतु, यात मोठ्या प्रमाणात थेट भ्रष्टाचार झाला आहे. काम 1 लाख रुपयांचे केले असेल, पण त्या कामाच्या नावाखाली 9 लाख 34 हजार 248 रुपये थेट सरपंचाच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आले आणि त्याच खात्यातून ते पैसे एका राजकीय व्यक्तीने सरपंच यांच्या खात्यातून काढून घेतले आहे. यातील पहिले काम हे उगले वस्ती ते वडजई माता रस्ता मुरुमीकरण करणे. यासाठी 2 लाख 5 हजार 71 रुपये काढण्यात आले. दुसर्‍या कामात म्हणजे अगस्ति विद्यालय ते दराडे वस्ती रस्ता मुरुमीकरण करणे. यासाठी 2 लाख 34 हजार 39 रुपये काढण्यात आले. तर तिसर्‍या कामात म्हणजे महादेव वस्ती ते आव्हाड वस्ती रस्ता मुरुमीकरण करणे. यासाठी 2 लाख 32 हजार 600 रुपये थेट काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे चौथ्या कामातही बिबदरवाडी ते सावरगाव पाट रस्ता मुरुमीकरण करणे यासाठी मंजूर 2 लाख 32 हजार 538 रुपये थेट सरपंच यांच्या खात्यातून काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यावेळी सरपंच म्हणून आदिवासी महिला अनिता राजू फोडसे या काम पाहत होत्या. त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आणि ग्रामविकास अधिकार्‍यांवर दबाव टाकून एका जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍याने गावातील नागरिकांना विश्वासात न घेता लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भाबड यांनी केला आहे. समशेरपूर जिल्हा परिषद गटातील अधिकारी व पदाधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खोट्या चौकशींचा धाक दाखवून जिल्हा परिषदेतील एका वरीष्ठ पदाधिकार्‍याच्या आशीर्वादाने सलग दोन वर्षे सातत्याने असे आर्थिक गैप्रकार सुरू असल्याचा आरोपही भाबड यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी लवकरात लवकर झाली नाही तर येत्या चार महिन्यांत अनेक आदिवासी सरपंच व ग्रामसेवक हे सुमारे 2 ते 2.5 कोटीच्या आर्थिक घोटाळ्यात गुंतण्याची शक्यता वर्तविली आहे.

यापूर्वी देखील समशेरपूर जिल्हा परिषद गटातील शेणित येथील तत्कालीन महिला सरपंच, केळी रुम्हणवाडी व तिरडे येथील सरपंच यांना ग्रामसेवक, पंचायत समिती अधिकारी व राजकीय नेत्यांच्या दूषकृत्यांचे बळी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. जर वरील प्रकरणात तथ्य आढळून आले आणि आर्थिक गैरप्रकार झाला असेल तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील. त्यामुळे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, असे आवाहन शीतल भाबड यांनी केले आहे.


आदिवासी महिला सरपंचाच्या अज्ञानपणाचा फायदा उठवून त्यांच्या खात्यातून नक्की पैसे कोणी काढले, ते पैसे कुणाच्या घशात गेले हे सध्या तरी अधांतरीच आहे. मात्र, यात जिल्हा परिषदेतील राजकीय व्यक्तीचा सहभाग नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची पंचायत समिती व जिल्हा परिषद चौकशी करणार का? असा सवालही समशेरपूर ग्रामस्थांना पडला आहे.

Visits: 20 Today: 1 Total: 116007

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *