भक्तांनीच ठेवल्या नदीकाठी गणेश मूर्ती!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गणेश स्थापनेच्या पाचव्या दिवशी अनेकजण गौरीसोबत गणपतीचेही विसर्जन करतात. संगमनेरातही मंगळवारी पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन झाले. मात्र भंडारदरा व निळवंड धरणातून सोडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील पाण्यामूळे काही भाविकांनी नदीपात्रात उतरुन विसर्जन करणे टाळले व सोबत आणलेल्या श्रींच्या मूर्ती काठावरील घाटांवरच सोडून दिल्या होत्या. बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रात्री उशीराने त्यांचे विधीवत विसर्जन केले. मात्र या घडामोडींबाबत सोशल माध्यमातून प्रशासनावर खापर फोडणारे संदेश फिरु लागल्याने काहीसा संभ्रमही निर्माण झाला होता. चौकशीअंती भक्तांनीच आपले बाप्पा नदीपात्रात विसर्जन करण्याऐवजी घाटांवर ठेवल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकारातून प्रशासकीय अनास्थेचेही दर्शन घडले आहे.
मंगळवारी राज्यातील पाच दिवसांच्या गणरायांना विधीवत निरोप देण्यात आला. संगमनेरातही अनेकांच्या घरी पाच दिवसांचे बाप्पा असल्याने सायंकाळी नदीकाठावर विसर्जनासाठी गर्दी दाटली होती. यावेळी काहींनी धोका पत्करुन पाण्यात बुडालेल्या घाटाच्या पायर्यांवरुन बाप्पांना विसर्जीत करीत भक्तिभावाने निरोप दिला, तर काहींनी धोका पत्करण्यापेक्षा नदीकाठावरच बाप्पांना ठेवून माघारी परतण्याचा निर्णय घेतला. प्रवरा नदी पात्रातील पाणी पातळी अधिक असल्याने स्थानिक प्रशासनाने सोमवारीच नदीकाठावर जाणारे मार्ग अडथळे निर्माण करुन बंद केले होते.
प्रशासनाने नदीपात्राकडे जाण्यास मज्जाव केला खरा, मात्र पाच दिवसांच्या बाप्पांना विसर्जीत करण्याची कोणतीही तजबीज केली नव्हती. त्यामुळे काहींनी धोका पत्करुन विसर्जन केले, तर काहींनी काठावरच आपले बाप्पा सोडले. यातून गणेशोत्सवाबाबत प्रशासनाची अव्यवस्था आणि अनास्था या दोहींचेही दर्शन घडले. वास्तविक प्रशासनानेच नदीकाठावर गणपती मूर्तीचा स्वीकार करुन त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र तसे काहीही घडले नसल्याचे मंगळवारच्या घटनेवरुन समोर आले. रात्री उशीराने बजरंग दलासह विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नदीकाठी जावून घाटांवर सोडून दिलेल्या सर्व गणेशमूर्तींचे विधीवत विसर्जन केले. यानंतर सोशल माध्यमात प्रशासनाचे वाभाडे काढणारा संदेश फिरु लागला. त्यातून प्रशासनाच्या अव्यवस्थेचाही निषेध नोंदविला गेला. प्रशासनानेच भाविकांना नदीकाठावर जाण्यापासून रोखले व त्यांच्याकडून गणेशमूर्ती ताब्यात घेवून त्या नदी काठावर तशाच सोडून दिल्याचा दावा या संदेशातून करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र संगमनेर नगरपरिषदेने केवळ नदीकाठाकडे जाणार्या मार्गांना अडथळे लावून बंद केले होते, त्याठिकाणी कोणत्याही कर्मचार्याची नेमणूक केलेली नव्हती. त्यामुळे कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कर्मचार्यांनी भाविकांच्या हातातून मूर्ती स्वीकारल्याचे आढळून आले नाही. घाटांवर आढळलेल्या मूर्तीही भाविकांनी स्वताच तेथे ठेवल्याचेही समोर आले आहे. सोशल माध्यमातील या संदेशाने शहरात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता, मात्र या सर्व घटनाक्रमाची सखेाल चौकशी करता वरीलप्रमाणे घटनाक्रम समोर आला आहे.