सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करु ः पोवार
नायक वृत्तसेवा, नेवासा
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याच्या सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना विश्वासात घेवून आपण खंबीरपणे कामकाज करु असा विश्वास नेवासा पोलीस ठाण्याचे नव्यानेच सूत्रे हाती घेतलेले पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी पत्रकारांशी सुसंवाद साधताना व्यक्त केला.
सोमवारी (ता.13) सायंकाळी 5 वाजता नेवासा पोलीस ठाण्यात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना नूतन पोलीस निरीक्षक पोवार म्हणाले, नेवासा पोलीस ठाण्याचे वातावरण सर्वांनाच ज्ञात आहे. आपण यापुढे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना विश्वासात घेवून कामकाज करु. या पोलीस ठाण्यात महसूलशी निगडीत अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात येत असल्याचे मला समजलेले आहे आणि हे काम पोलिसांकडून होण्याची अपेक्षा जनतेची असते. पोलिसांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारी संपुष्टात आणण्याची जबाबदारी असते. महसूलशी निगडीत कामे हे तहसील कार्यालयाचे असून जनतेने ती कामे त्या विभागात करुन घ्यावे. पोलिसांच्या अखत्यारित असणारे काम पोलीस सक्षमपणे पार पाडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यभूमीत मला काम करण्याची संधी मिळाली ही कौतुकास्पद बाब असून जनतेने आपल्या तक्रारी पोलीस ठाण्यात बेडरपणे मांडाव्यात. सत्यता पडताळून पोलीस न्याय देण्याचे काम करतील असे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.सुनील गर्जे यांनी आभार मानले.