डोळ्यादेखत दुचाकीच्या डिकीतून अडिच लाखाची रक्कम गायब! चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद; संगमनेरात पैसे लांबविण्याचे प्रकार पुन्हा सुरु..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवण्यासह पाळत ठेवून पैशाच्या पिशव्या चोरण्याचे प्रकार थांबले असल्याचे वाटत असतांनाच सोमवारी चक्क एका शेतकर्‍याच्या डोळ्यादेखत त्याची 2 लाख 60 हजार रुपयांची रोकड घेवून चोरट्यांनी पोबारा केला. विशेष म्हणजे सदरचा चोरटा दुचाकीची डीकी उघडीत असतांनाच त्या शेतकर्‍याचे लक्ष गेले, मात्र तरीही सराईत असलेले चोरटे पैसे घेवून पसार झाले. याबाबत तालुक्यातील ओझर खुर्द येथील शेतकरी संजय भाऊसाहेब शेजूळ यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून बँकेच्या परिसरात पाळत ठेवून पैसे लांबविण्याचे लोण पुन्हा सुरु झाल्याचे समोर आले आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील ओझर खुर्द येथील शेतकरी संजय भाऊसाहेब शेजूळ यांनी आपल्या मालकीचा ट्रॅक्टर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा ऊस वाहण्यासाठी चाळीसगाव येथील मुकादम गोवर्धन हरी राठोड यांच्याकडे दिला आहे. त्यापोटी शेजूळ यांना मुकादमाकडून 2 लाख 60 हजार रुपयांची रक्कम घ्यायची होती. ती घेण्यासाठी सोमवारी (ता.9) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते अमृतवाहिनी बँकेत आले. तेथे मुकादम राठोड यांनी त्यांना वरीलप्रमाणे रोख रक्कम सुपूर्द केली. ती रक्कम शेजूळ यांनी आपल्या उपरण्यात बांधून मोटार सायकलच्या डिकीत ठेवली व त्याचा भरणा बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील आपल्या खात्यात भरण्यासाठी ते निघाले.


दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास गणेशनगर परिसरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर येऊन त्यांनी आपली दुचाकी (क्र.एम.एच.17/ए.2716) उभी केली व बँकेच्या रोखापालकडे भरणा घेता का म्हणून विचारायला ते आंत गेले. त्या वेळेतच पाळतीवर असलेल्या एका चोरट्याने त्यांची डिकी उघडून त्यातील 2 लाख 60 हजारांची रोकड काढली. विशेष म्हणजे त्या चोरट्याने रोकड असलेले उपरणे डिकीतून बाहेर काढतांना शेजूळ यांची नजर त्याच्यावर गेली. त्यांनी लागलीच बँकेच्या बाहेर धाव घेतली. मात्र सदरचा चोरटा तेथून काही अंतर चालत जावून नाशिक-पुणे महामार्गावर आधीच तयारीत असलेल्या आपल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसला आणि तेथून पसार झाला.


यावेळी शेजूळ यांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने तेथून जाणार्‍या त्यांच्या गावातील भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांच्याकडे जावून विचारणा केली असता त्यांना घडला प्रकार समजला. त्यावर त्या दोघांनीही शिंदे यांच्या दुचाकीवरुन त्या चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून ते अचानक सुसाट वेगाने अदृष्य झाले. यानंतर या दोघांनीही पुन्हा बँक ऑफ इंडियात जावून घडला प्रकार सांगीतला असता शाखा व्यवस्थापकाने सीसीटीव्ही तपासले. त्यात सदरचा प्रकार अगदी स्पष्टपणे कैद झाला. सदरचे फूटेज सोबत घेवून शेजूळ यांनी शहर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. त्यानुसार शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली असून गेल्या काही दिवसांपासून बंद झालेल्या सोनसाखळी ओरबाडण्याच्या व पाळत ठेवून बँकेतून पैसे घेवून निघालेल्यांच्या पिशव्या पळविण्याचे प्रकार पुन्हा सुरु झाल्याने चोरट्यांची दहशत निर्माण होवू पाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या दक्षिणेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओरबाडण्याच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र संगमनेरात नेहमी घडणार्‍या अशा प्रकारांना आळा बसला होता. आजच्या घटनेने तसे प्रकार पुन्हा सुरु झाल्याचे समोर आले असून नागरिकांनी सतर्क राहण्यासह पोलिसांनीही आपल्या बंदोबस्ताच्या योजना बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये चोरटा स्पष्टपणे कैद झाला आहे, त्यावरुन पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतात का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Visits: 177 Today: 2 Total: 1420507

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *