आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल वयोवृद्धास मारहाण करुन छळ; गदेवाडी येथील घटना

नायक वृत्तसेवा, शेवगाव
दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत याचा राग मनात धरुन चारचाकी गाडीतून पळवून नेत एका वयोवृद्धास मारहाण व छळ करुन त्यांना गळफास घेवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गदेवाडी (ता.शेवगाव) येथील तीन जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आत्महत्या केलेल्या मयताचे नाव विनायक किसन मडके (वय 65, रा.गदेवाडी, ता.शेवगाव) असे असून मयताचा मुलगा तुळशीराम विनायक मडके (वय 30) यांच्या फिर्यादीवरुन मुकेश दत्तात्रय मानकर, रुपेश दत्तात्रय मानकर, मच्छिंद्र एकनाथ धनवडे यांच्या विरुद्ध मानसिक व शारीरिक छळ करुन व त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल व इतर कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गदेवाडी येथील रहिवाशी असलेले विनायक मडके हे आठ दिवसांपूर्वी स्वत:च्या मालकीच्या घोड्यावरुन शेतात जात असताना गावातील मुकेश व रुपेश मानकर, मच्छिंद्र धनवडे यांनी त्यांच्या चारचाकी 2223 (पूर्ण क्रमांक माहिती नाही) या गाडीने हुलकावणी देत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी वडील गावात गेले असता या तिघांनी त्यांना दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. वडीलांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना शिवीगाळ व दमदाटी करुन लाथाबुक्यांनी माराहण केली. ‘तु आम्हांला पैसे दिले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. वडीलांनी घरी येवून आम्हांस हा प्रकार सांगितला. 9 सप्टेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास या तिघांनी घरी येवून वडीलांना जबरदस्तीने त्यांच्या चारचाकी गाडीतून पळवून नेले. त्यानंतर माझ्या मोबाईलवर फोन करुन रुपेश मानकर याने तुझ्या वडीलांना जीवंत सोडणार नाही असे म्हणत मला देखील शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी फोनवर वडीलांना मारहाण करत असल्याने त्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. त्यानंतर वडीलांचा शोध घेण्यासाठी आम्ही गेलो असता गदेवाडी गावाच्या शिवारास मच्छिंद्र धनवडे यांच्या मालकीच्या हॉटेल सुयोग समोर त्यांची गाडी उभी होती. हॉटेलकडे जावून पाहिले असता हे तिघेजण वडीलांना मारहाण करीत असल्याचे दिसले. त्यानंतर मी घरी येवून मोठा भाऊ गोरख यास हॉटेलवर घेवून गेलो. तेव्हा वडीलांना मारहाण करणारे तेथून निघून गेले होते.

वडीलांचा आसपास शोध घेतला असता हॉटेलच्या पाठीमागील शेतामध्ये बोरीच्या झाडाला ते गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत दिसले. आम्ही त्यांना तातडीने खाली उतरवून घेवून शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मुकेश, रुपेश मानकर व मच्छिंद्र धनवडे या तिघांविरुद्ध वडीलास मारहाण करुन त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणांतील दोषी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मयत विनायक मडके यांच्या नातेवाईकांनी सकाळी 11 वाजता शवविच्छेदन केल्यानंतरही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत मृतदेह शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयातच होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मृतदेह गदेवाडी येथे नेवून अंत्यसंस्कार करण्यात आला.

Visits: 29 Today: 1 Total: 255748

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *