कोल्हेंच्या भूमिकेतून नथुराम गोडसेचं उदात्तीकरण होऊ नये! महसूल मंत्री थोरातांची खासदार कोल्हेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे आगामी चित्रपटात नथुराम गोडसे याच्या भूमिकेत दिसणार आहेत. गोडसेची भूमिका करण्याच्या त्यांच्या निर्णयावरून सध्या राजकीय व सामाजिक वर्तुळात वादळ उठलं आहे. काही नेत्यांनी कोल्हे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे तर काहींनी संयमी भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही याबद्दल आपलं मत मांडलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना थोरात यांनी या संदर्भात भाष्य केलं. ‘कलाकार हा कलाकार असतो. त्याच्या कलेला बंधन असू नये. मात्र, एखाद्या भूमिकेतून चुकीच्या विचारांचं उदात्तीकरण होणार नाही याची काळजी घेतली जायला हवी. कोल्हे यांच्या भूमिकेतून नथुराम गोडसे याचं उदात्तीकरण होऊ नये, असं थोरात म्हणाले.’ ज्यांच्या नेतृत्वामुळं देशाला स्वातंत्र्य मिळालं, ज्यांच्या विचारांमुळं देश आज प्रगती करतो आहे, त्यांच्या विरोधात ही भूमिका नसावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘व्हाय आय किल्ड गांधी’ नावाचा हिंदी चित्रपट येत्या महिना अखेरीस ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हे यांच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘अमोल कोल्हे हे कलाकार म्हणून ही भूमिका करत असले तरी त्यात नथुराम गोडसे याचं समर्थन आहे. कलाकाराचा वेष घेऊन कोणी गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही. त्यामुळं या चित्रपटाला आम्ही विरोध करणार,’ अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. नवाब मलिक यांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेतली आहे. ‘अमोल कोल्हे यांनी 2017 साली ही भूमिका केली होती. मात्र, ते गांधीजींच्या हत्येचं वा त्यांच्या मारेकर्‍यांच्या विचाराचं समर्थन करत नाहीत असं त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे,’ असं मलिक म्हणाले.

Visits: 9 Today: 1 Total: 116295

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *