शिवजयंती कोणाची यावरुन संगमनेरात वादंग होण्याची चिन्हे! शिवसेनेची पारंपरिक मिरवणूक; ठाकरे व शिंदे गटाकडून परवानगीचे स्वतंत्र अर्ज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तारखेनुसार की तिथीनुसार यावरील वाद सुरु होण्यापूर्वीपासून राज्यात शिवसेनेच्यावतीने दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा प्रघात आहे. मात्र गेल्या सहा-आठ महिन्यांत राज्यात निर्माण झालेली राजकीय स्थिती आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षाबाबत घेतलेला निर्णय यामुळे यंदाच्या या उत्सवाबाबत काहीसा संभ्रम निर्माण झालेला असताना शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून शहर पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर काहीसा पेच निर्माण झाला असला तरीही यापूर्वीप्रमाणेच परवानगी दिली जाईल अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने व त्याला अद्यापही शिंदे गटाने सहमती न दर्शविल्याने यंदाच्या शिवजन्मोत्सवावर वादाचे ढग जमा होवू लागले आहेत. यातून मध्यम मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी आज पत्रकारांना टाळून ‘शांतता समिती’ची बैठकही बोलावली होती, मात्र ती देखील निष्फळ ठरली आहे.

गेल्या दोन दशकांपूर्वी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव तारखेनुसार साजरा करावा की तिथीनुसार यावरुन राज्यात दोन मतप्रवाह निर्माण झाले. तत्पूर्वी संपूर्ण देशात तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्याची पद्धत होती. मात्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीने तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्याचा पुरस्कार केल्याने राज्यात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतरही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवरायांचा जन्मोत्सव तिथीनुसारच साजरा करण्याची भूमिका घेतल्याने आजही संपूर्ण राज्यात 19 फेब्रुवारीला साजरी होणारी शिवजयंती ‘सरकारी’ तर तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती शिवसेनेची समजली जाते.

यंदा शुक्रवार 10 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार आहे. त्यासाठी हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्यावतीने अध्यक्ष त्रिलोक कन्हैय्यालाल कतारी यांनी गेल्या 22 फेब्रुवारी रोजी शहर पोलिसांना विनंती अर्ज दिला आहे. त्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) शिवजयंती साजरी केली जात असल्याचा व सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्यावतीने शहरातून शिवप्रतिमेची सवाद्य शोभायात्रा काढली जात असल्याचे म्हंटले आहे. याशिवाय या अर्जात उत्सवाचे स्वरुप वर्णन करण्यात आले असून वरील दिवशी हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाला हा उत्सव साजरा करण्याची व सायंकाळी पारंपरिक मिरवणूक काढण्याची परवानगी मागण्यात आली आहे.

दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आगामी कालावधीतील काही ठिकाणच्या निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला याआधी निवडणूक आयोगाने दिलेले नाव व मशाल हे चिन्ह वापरण्यास परवानगी दिली आहे, मात्र हा निर्णय स्थायी स्वरुपाचा नाही. त्यामुळे कायदेशीर दृष्टीकोनातून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सद्यस्थितीतले स्वामित्त्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे यावरुन सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आजही संभ्रमाचे वातावरण आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याने आम्हीच खरी शिवसेना म्हणत शिंदे गटाच्या संगमनेरातील पदाधिकार्यांनी यंदाची पारंपरिक शिवजयंती आपल्याला साजरी करण्याची परवानगी मिळावी यासाठी शहर पोलिसांकडे स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकाच उत्सवासाठी दोन गटातून वेगवेगळे अर्ज दाखल झाल्याने पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी नेहमीप्रमाणे कचखाऊ भूमिका घेत पत्रकारांना टाळून आज (ता.27) शांतता समितीची बैठक बोलावली होती. यावेळी ठाकरे गटाच्या शहरप्रमुख अमर कतारी यांनी परंपरेची जाणीव करुन देत या उत्सवात सर्वपक्षीयांसाठी कवाडे उघडी असल्याचे सांगत शिंदे गटानेही शोभायात्रेत व उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.

मात्र याबाबत आपण परस्पर निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचे सांगत शिंदे गटाच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे व शहरप्रमुख विकास भरीतकर यांनी वरीष्ठांशी चर्चा केल्यानंतरच ठाकरे गटासोबत ‘शिवसेने’ची पारंपरिक शिवजयंती साजरी करायची की स्वतंत्रपणे याचा निर्णय घेवू असे सांगत ‘शांततेसाठी’ बोलावलेल्या बैठकीत ‘अशांतता’ निर्माण करुन तेथून काढता पाय घेतला. यावेळी जाताजाता त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगत या संपूर्ण उत्सवाचे गांभीर्य वाढवतानाच त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्यास ‘वादंग’ होण्याची शक्यताही निर्माण केली आहे.

मागील काही दिवसांतील राज्यात घडणार्या घडामोडी पाहता उद्धव ठाकरे यांच्या गटाला शह देण्यासाठी वरीष्ठ पातळीवरुन या गटाच्या परवानगी अर्जांना नाकारण्याचे व शिंदे गटाच्या अर्जांना स्वीकारण्याचे आदेश मिळाल्यास त्यातून राजकीय वादावादीचे आणि पर्यायाने वादंगाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता दाटली असून त्यांच्या प्रारंभीची कथाच जणू आज संगमनेर शहर पोलिसांसमोरच लिहिली गेली आहे. त्यावर आता काय निर्णय होतो आणि तो दोन्ही गटांना मान्य होतो का यावरच यंदाच्या शिवजयंती उत्सवाची शांतता अवलंबून आहे. ठाकरे गटाचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी याबाबतचा अर्ज दाखल करताना पूर्वी पोलिसांनी त्यांना दिलेल्या परवानगीचे दाखलेही जोडले आहेत, त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या कतारी यांची मागणी योग्य असली तरीही आज शिवसेनेचे स्वामित्त्व कोणाच्या हाती आहे त्यावर परवानगी देण्याची गरज असल्याचाही मतप्रवाह निर्माण झाला आहे.

पोलिसांचा सुमडीत कोंबडी करण्याचा प्रयत्न..
राज्याप्रमाणे संगमनेरातही शिवसेनेचे दोन गट असल्याची पूर्ण माहिती असतानाही सातत्याने गळचेपी, कचखाऊ आणि पळपुटी भूमिका घेणार्या पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी आज केवळ ठाकरे गटातील काही मोजक्या लोकांना आपल्या दालनात बोलावून त्याला ‘शांतता समिती’च्या बैठकीचा रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यातून शिवसेनेच्या शिंदे गटासह अन्य हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून तिथीनुसार निघणारी पारंपरिक शिवजयंतीची शोभायात्रा शिवसेनेची असल्याचे व शिवसेनेचे स्वामित्त्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची आठवणही करुन देण्यात आली आहे.

