व्यंकटेश देवस्थानच्या इनामी जमिनीच्या बेकायदा खरेदीचा आरोप
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सोनई येथील गट क्रमांक 157 मधील व्यंकटेश देवस्थान इनामी वर्ग तीनची जमीन वर्ग दोन दाखवून खरेदी-विक्री प्रकार झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकारी व खरेदी-विक्री करणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नेवासा देखील माहिती अधिकाराबाबत नेहमी सजग असलेल्या काकासाहेब बाजीराव गायके यांनी या गैरव्यवहारबाबत जिल्हाधिकार्यांकडे नुकतेच तक्रारीचे निवेदन दिले आहे.
इनामी जमीन असताना ती वर्ग दोन दाखवत 32 एम प्रमाणपत्र नोंदवून 157 गटातील 17 गुठ्यांची खरेदी झाली आहे असे निवेदनात नमूद केले आहे. जमीन नेवासा तहसीलदार यांचेसह इतर अधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालय, नेवासा यांनी बनावट कागदपत्र देऊन 6 फेब्रुवारीला दस्त क्रमांक 128 ने खरेदी केलेली आहे. कूळ कायदा अहमदनगर यांनी माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवरुन सदरच्या क्षेत्रातील देवस्थान जमीन वर्ग तीन असून सदरची जमीन एका महिलेच्या नावावर आहे. बेकायदेशीर व बनावट खरेदी करुन घेणारे सोनई येथील एक सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. खरेदी देणारे नेवासा तहसीलदार तर साक्षीदार पानसवाडी येथील आहेत. नेवाशाचे तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी हे खरेदी दस्तावेज तयार केलेले आहे. सदर जमीन खरेदी-विक्री प्रकरणास जिल्हाधिकारी कार्यालयाने पूर्व परवानगी दिली असल्यास त्याची सत्यप्रत मिळावी. याप्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सदर अधिकारी व लोकांविरुद्ध न्यायालयात मला खटला चालविण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी गायके यांनी निवेदनातून केली आहे.