राज्यातील प्रत्येक शेतकर्याला घरपोहोच सातबारा मिळणार ः थोरात उंदीरगाव येथे रस्त्याचे भूमिपूजन व ई-पीक पाहणी ऑनलाईन नोंदणी प्रणालाची शुभांरभ

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राज्यातील प्रत्येक शेतकर्याला पुढील महिन्यात नूतन प्रणालीद्वारे घरपोहोच सातबारा मोफत मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागेल. हे सर्व कामकाज महसूल विभागाला करायचे असून नव्याने आलेल्या सातबार्यात काही दोष असल्यास तत्काळ दुरुस्ती केली जाईल. तसेच ‘8 अ’ देखील दुरुस्ती होणार असून 2016 नंतरचे फेरफार ऑनलाईन काढता येईल. त्यासाठी सातबार्यावरील फेरफार क्रमांकास स्वतंत्र लिंक देणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना विविध सुविधांचा लाभ आपल्या मोबाईलद्वारे मिळणार असल्याची, ग्वाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

महसूल मंत्री थोरात सोमवारी (ता.30) श्रीरामपूर दौर्यावर आले असता तालुक्यातील उंदीरगाव येथील रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी ई-पीक पाहणी ऑनलाईन नोंदणी प्रणालाची शुभांरभ केला. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॉटसह मोफत रुग्णवाहिका व विस्तारित कोविड रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर येथील इच्छामणी मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, ज्ञानदेव वाफारे, सचिन गुजर, इंद्रनाथ थोरात, राजश्री ससाणे, अशोक कानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रातांधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, डॉ. योगेश बंड, डॉ. मोहन शिंदे यांच्या समवेत आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविकात कोविडबाबत जिल्ह्यातील उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. तर ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे संवाद साधला. तसेच आमदार कानडे यांनीही तालुक्यातील विकास कामाची माहिती दिली. महसूल मंत्री थोरात म्हणाले, सातबारा ऑनलाईन झाल्यामुळे शेतकर्यांना तो कुठेही काढता येतो. आता नवा उताराही ऑनलाईन मिळतो. त्यातील पोट खराबा काढला असून आणखी अनावश्यक बाबींची साफसफाई केली आहे. तसेच सातबार्यातील जातीवाचक शब्द देखील काढण्यासाठी लवकरच ठराव केला जाईल. त्यामुळे नव्या स्वरुपातील सातबारा पुढील महिन्यात प्रत्येक शेतकर्याला घरपोहोच मोफत देणार आहे. यापूर्वी पीक पाहणी तलाठी शेतबांधावर जावून करीत. परंतु आता ऑनलाईन पीक पाहणीसाठी अॅप डाऊनलोड करुन फोटो अपलोड करुन नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. ई-पीक पाहणी प्रणालीचे अनेक फायदे असून कोणत्या पिकांची किती लागवड झाल्याचे अधोरेखित होईल. पीक लागवडीची आकडेवारी तत्काळ ऑनलाईन दिसेल. तसेच कृषी संबंधित कंपन्या पिकांच्या माहितीची कृषी विभागाकडे मागणी करतील. अनुदानासह पीकविमा योजनेसाठी देखील त्याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा धोका अद्यापही कायम..
कोरोना संसर्ग रोखण्यात महाराष्ट्राच्या कामगिरीचे देशभरात कौतुक झाले असून राज्य सरकारने मृत्यू लपविण्याचे काम केले, नसून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळली. अनेक लोक आमच्यासोबत फोटो काढतात. परंतु आम्ही कोरोनामध्ये काम करणार्या डॉक्टरांसोबत फोटो काढले. कोरोनाच्या दुसर्या लाटेत अधिकारी आणि कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करीत होते. डॉक्टरांनी जीव धोक्यात टाकून रुग्णांचे जीव वाचविले. त्यामुळे कोरोनाचे संकट अद्याप टळले नसून डेल्टासह डेल्टा-प्लस निघाल्याने कोरोनाचा धोका कायम असून काळजी घेण्याचे, आवाहन शेवटी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
