वेठबिगारीसाठी आणलेल्या आदिवासी मुलीच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा! शिंदोडीतील मेंढपाळ दाम्पत्याला अटक; अ‍ॅट्रोसीटीचाही समावेश, आजअखेर पोलीस कोठडी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आदिवासी बहुल भागातील गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलांना वेठबिगारीवर आणण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता या प्रकरणातील एक एक कडी उलगडायला सुरुवात झाली आहे. त्यातीलच इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील बेठबिगारीवर आणलेल्या एका अल्पवयीन मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर घारगाव पोलिसांनी तालुक्यातील शिंदोडी येथील विकास व त्याची पत्नी सुमन कुदनर या दोघांवर खुनासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्या दोघांनाही कारागृहात टाकले आहे. यातील आरोपी सुमन कुदनर हिने जखमी मुलीला उपचारासाठी दवाखान्यात नेतांना सदरील मुलगी आपली असल्याचे सांगितले होते, तर तिचा पती विकास याने बेशुद्ध अवस्थेत तिला उभाडे येथील तिच्या आई-वडीलांच्या घरासमोर गुपचूप टाकून तेथून पलायन केले होते. या दोघाही पती-पत्नींना आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

यातील मयत दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी इगतपूरी तालुक्यातील उभाडे येथील राहणारी असून संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील विकास सीताराम कुदनर याच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून मेंढ्या सांभाळण्याचे काम करीत होती. दीड वर्षांपूर्वी विकास कुदनर याने आपल्यासोबत तिला उभाडे येथे नेले होते, त्यानंतर त्या लहानशा जीवाची मरेपर्यंत आपल्या जन्मदात्यांशी भेट होवू शकली नाही. 28 ऑगस्ट रोजी पहाटे चारच्या सुमारास मयत मुलीचा पिता लघुशंकेसाठी आपल्या झापातून बाहेर आला असता त्यांना लाल रंगाच्या ब्लॅकेंटमध्ये एका मुलीला गुंडाळून ठेवले असल्याचे दिसले. त्यांनी मुलीच्या चेहर्‍यावरील ब्लॅकेंट बाजूला करीत अंधरात पाहीले असता सदर मुलगी कोणतीही हालचाल करीत नव्हती.

त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी धावत जावून वस्तीवरील अन्य माणसांना बोलावून आणले. यावेळी जमलेल्या लोकांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता ब्लॅकेंटमध्ये गुंडाळलेली मुलगी संबंधिताचीच असल्याचे पाहिल्यानंतर त्या माय-बापांनी एकच हंबरडा फोडला. त्यानंतर जमलेल्या इतरांनी परिसरातील एकाची पिकअप जीप आणून त्यातून घोटी येथील सरकारी दवाखान्यात तिला उपचारार्थ नेले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी जखमी मुलाच्या गळ्याभोवती व हाताच्या कोपर्‍यावर जखमा असल्याचे निरीक्षण नोंदवून पुढील उपचारार्थ तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेण्याची सूचना केली. त्यानुसार 27 ऑगस्टरोजी जखमी अल्पवयीन मुलीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असूनही ती काहीच हाचाल करीत नसल्याने तिच्या आई-वडीलांनी विकास कुदनर याला मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद होता.

त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या अहवालावरुन नाशिक पोलिसांनी जखमी मुलीच्या पालकांचा जवाब नोंदवून तो घोटी पोलिसांकडे पाठविल्यानंतर संगमनेर तालुक्यातील विकास सीताराम कुदनर व त्याची पत्नी सुमन विकास कुदनर या दोघांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपासासाठी तो 28 ऑगस्ट रोजी घारगाव पोलिसांकडे वर्ग केला गेला. सदर प्रकरणी घारगाव पोलिसांनी सुरुवातीला कलम 307 नुसार तपास सुरु केला असता सदरील मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त आल्याने पोलिसांनी दाखल गुन्ह्यात खुनाच्या 302 कलमासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम वाढवून विकास कुदनर व त्याची पत्नी सुमन या दोघांनाही शनिवारी सायंकाळी अटक केली व त्यांना रविवारी (ता.11) न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची रवानगी एक दिवसाच्या पोलीस कोठडीत करण्यात आली.

सदरील मुलीचा उपचारादरम्यान नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला असून तिचे शवविच्छेदनही करण्यात आले आहे, मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र शवविच्छेदन अधिकार्‍यांनी नोंदविलेल्या मृत्यूच्या निष्कर्षानुसार मुलीच्या पाठीवरील जखम, गळ्याभोवती असलेली जखम ही उपचारार्थ दाखल केल्याच्या पहिल्या दिवसाची असल्याचा अभिप्राय दिल्याने घारगाव पोलिसांनी सुरुवातीला दाखल केलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात खुनाचे कलम 302 व मयत अनुसूचित जातीची तर आरोपी सवर्ण असल्याने आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तालुक्यात अजूनही अशाप्रकारे किती लहान मुलांचे जीवन बेठबिगारीला बांधले गेले असेल याबाबत चर्चा सुरु आहेत.


या प्रकरणातील दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर खर्‍याअर्थी हा सगळा प्रकार समोर आला. या प्रकरणात आत्तापर्यंत मुख्य दलालासह संगमनेर व पारनेर तालुक्यातील एकूण सहा जणांची नावे समोर आली असून तालुक्यात मेंढपाळांची मोठी संख्या असल्याने त्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सदर प्रकरणाचा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला असला तरीही त्याचा सुरुवातीपासूनचा तपास उपविभागीय अधिकारी राहुल मदने स्वतः करीत आहेत. अशाप्रकारांना जबाबदार असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

Visits: 5 Today: 1 Total: 27285

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *