रोजीरोटीच्या प्रश्नांना बगल देण्याचे कारस्थान हाणून पाडू ः भांगरे माकपचे अकोले तालुक्यात आदिवासी जागृती अभियान

नायक वृत्तसेवा, अकोले
रोजीरोटी, शिक्षण, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य व सामाजिक सुरक्षा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नसलेले लोक तालुक्यात आता जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालत आहेत. नामांतर व जातीच्या संघटनांचे राजकारण करत आहेत. आदिवासी बिगर आदिवासी यांच्यात दुहीचे विष पेरून आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजू पाहत आहेत. जातीच्या संघटना बांधण्याच्या नादात आपण पिढ्यानपिढ्या एकत्र नांदत असलेल्या आदिवासी समुदायात जातींमध्ये भांडणे लावत आहोत याचेही भान सोडून देण्यात आले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा जातीयवादी प्रवृत्तीचे हे मनसुबे कदापि यशस्वी होऊ देणार नाही. आदिवासी व बिगर आदिवासी श्रमिकांचे मूलभूत प्रश्नच या तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू होते व पुढेही राहतील, असे रोखठोक प्रतिपादन कॉम्रेड नामदेव भांगरे यांनी केले.

आदिवासी जागृती अभियानाची सुरवात शेंडी पट्ट्यातील गावांना भेटी देऊन करण्यात आली तेव्हा ते बोलत होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने तालुक्यात व्यापक आदिवासी जागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. कॉम्रेड नामदेव भांगरे यांच्या नेतृत्वाखाली या अभियानांतर्गत शेंडी विभागातील भंडारदरा, मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी, साम्रद, घाटघर, शिंगणवाडी, उडदावणे, पांजरे, मुरशेत, शेंडी, चिचोंडी गावाचा जागृती दौरा संपन्न झाला. आदिवासींचे रेशन, वन जमीन, वन धन, आरोग्य व रस्ते, वीज, पाण्याच्या मूलभूत सुविधांच्या हक्कांबाबत अकोल्यात व्यापक परिषद घेण्यात येणार आहे. माकपच्यावतीने आदिवासी जागृती दौर्‍यातून या परिषदेची तयारी सुरू करण्यात आली आहे.

घरकुल अनुदानाच्या हप्त्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामसेवक 10 हजार रुपयांची लाच मागतात, पैसे घेतल्याशिवाय अनुदान वर्ग करत नाहीत. घरकुलाच्या ‘ड’ यादीतून बेघर गरिबांची नावे वगळली गेली आहेत. यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी गावचे पुढारी आणि अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागतात. रेशनकार्ड असूनही रेशन मिळत नाही. रेशन काळ्या बाजारात विकले गेल्याच्या बातम्या येतात. मात्र आम्ही रेशन घ्यायला गेलो की रेशन संपले म्हणून सांगितले जाते. रोजगारासाठी रोज नारायणगाव, सिन्नरच्या भागात जावे लागते. तालुक्यात मात्र रोजगार हमीची कामे सुरू करण्याची सद्बुद्दी कुणालाच होत नाही. आदिवासी हक्क जागृती दौर्‍यात यासारखे असंख्य प्रश्ना आदिवासी श्रमिक मांडत आहेत. आदिवासी श्रमिकांचे हे मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्यासाठी माकपने कंबर कसली आहे. शेंडी विभागानंतर सातेवाडी विभागाचा दौरा केला जाणार आहे. या दौर्‍यात नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, गणपत मधे, शांताराम वारे, कैलास वाघमारे, पांडुरंग गंगाड, नमाजी गंगाड, दशरथ झडे, दिलीप हिंदोळे, साहेबराव घोडे, देवराम डोके, सुरेश गिर्‍हे, मंगेश गिर्‍हे, किसन मधे, निवृत्ती डोखे, दत्तू पदमेरे आदी सहभागी आहेत.

Visits: 14 Today: 1 Total: 117081

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *