रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे महिलेचा जीव गेल्याचा नातेवाईकांचा आरोप! बजावून सांगितलेले असतांनाही ‘रेमडेसिव्हीरचा’ वापर; संतप्त मुले जाणार न्यायालयात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कुटुंबातील एकाला कोविडचे संक्रमण झाले, त्याचा फटका आपल्या आईला बसू नये यासाठी मुलांनी लागलीच आईचीही कोविड तपासणी केली. मात्र दोन्ही चाचण्यांचे अहवाल ‘नकारात्मक’ (निगेटिव्ह) आले. तरीही धोका नको म्हणून दोन्ही मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी विचारांती बाधित मुलगा दाखल असलेल्या रुग्णालयातच डॉक्टरांच्या निगरानीत ‘त्या’ महिलेला ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने रुग्णालयात दाखल करतांना संगमनेरातील ‘त्या’ खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना तशी पूर्वसूचना देवून ‘आमच्या आईला कोणताही त्रास नाही, फक्त काळजी म्हणून दवाखान्यात दाखल केले आहे. कोणत्याही स्थितीत आईला रेमडेसिव्हीर देवू नका’ असेही स्पष्टपणे बजावले होते. मात्र या उपरांतही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णालयातील परिचारकांनी नको ते केलेच आणि त्याचा परिणाम ‘त्या’ महिलेचे निधन झाले. या घटनेचा धक्का बसलेल्या पठारभागातील ‘त्या’ कुटुंबाने रुग्णालयात जावून डॉक्टरांना जाबा विचारला, मात्र त्यांच्याकडे उत्तर नाही. अखेर त्या महिलेच्या पाचही मुलांनी कायदेशीर मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला असून मृत्यू पावलेल्या महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील पठारभागात असलेल्या गुंजाळवाडी पठारावरील हा प्रकार आहे. येथील एक पाच भावांचे शेतकरी कुटुंब आपल्या आईसह सुखाने संसार करुन रहाते. शेती हा आपल्या उपजीविकेचा व्यवसाय असल्याने या पाचही भावंडांसह त्यांच्या कुटुंबातील सगळीच मंडळी शेतीच्या कामात व्यस्त असते. स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) त्यातील सर्वात लहान भावाला कोविडचे संक्रमण झाले. त्याबाबतची माहिती घरी पोहोचली तेव्हा ‘त्या’ मुलांची 55 वर्षीय आई शेतात काम करीत होती. उर्वरीत चौघा भावंडांनी आपल्या लहान भावाला संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे त्या तरुणाला कोणताही त्रास नव्हता, मात्र कुटुंबासह गावातील अन्य कोणालाही संसर्ग होवू नये यासाठी त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.
आता कुटुंबातील सदस्यच बाधित आढळल्याने बाकीच्या कुटुंब सदस्यांनीही आपली कोविड चाचणी करुन घेतली. त्यातून सर्वांचे निष्कर्ष नकारात्मक (निगेटिव्ह) आले, मात्र काळजी म्हणून संसर्ग नसूनही त्यांनी आपल्या 55 वर्षीय आईला लहान भाऊ दाखल असलेल्या रुग्णालयातच दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ती मंडळी आईसह पठारावरुन घुलेवाडीतील ‘त्या’ खासगी रुग्णालयात आले. तेथील डॉक्टरांशी चर्चा झाली, दाखल करण्यासाठी आणलेल्या महिलेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यावरुन संबंधित डॉक्टरांनी ‘त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही’ असेही सांगितले. मात्र आमची आई हाच आमचा आधार आहे, आम्हाला काळजी वाटते म्हणून दोन दिवस तुमच्या डोळ्यासमोर राहू द्या असे त्या भावंडांनी सांगितल्यावरुन अखेर त्या महिलेला तेथे दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्या चारही भावंडांनी ‘आमच्या आईला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, तिला कोणत्याही स्थितीत रेमडेसिवीर देवू नका’ अशी स्पष्ट सूचनाही दिली.
16 ऑगस्टपासून त्या रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेला त्यानंतरही कोणताही त्रास होत नव्हता. मात्र त्या उपरांतही संबंधित रुग्णालयातील नर्सिंग कर्मचार्यांनी त्या महिलेच्या मुलांसह रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रेमडेसिव्हीर न देण्याबाबत केलेल्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष केले आणि त्यांना ती लस दिलीच. त्यामुळे 19 ऑगस्टपासून त्या महिलेची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे घाबरलेल्या रुग्णालयातील कर्मचार्यांनी मग त्यांच्यावर विविध प्रयोगही केलेत, त्यातच 20 ऑगस्टरोजी त्या महिलेचे निधन झाले. कोणताही त्रास नसतांना, केवळ काळजीपोटी दाखल झालेला रुग्ण आणि त्यातही रेमडेसिव्हीर देवू नका असा स्पष्ट सांगितलेले असतांनाही रुग्णालयाने तीच गोष्ट केल्याने त्यामुहेच आपल्या आईचा जीव गेल्याचे सांगत त्या पाचही भावंडांनी डॉक्टरांना जाब विचारला, पण त्यांच्याकडून समाधान होवू शकले नाही.
शेवटी त्यांनी मृत महिलेचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला, मात्र कोविडच्या नावाखाली त्यातही आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आईच्या निधनाने व्यथीत झालेल्या त्यांच्या पाचही मुलांनी ‘त्या’ रुग्णालयाचा अंधाधुंद कारभार उघड करण्याचा निर्णय घेतला आणि शवविच्छेदनाच्या भूमिकेवर ठाम राहीले. शेवटी त्या महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा व्हिसेरा नाशिकच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात ‘त्या’ रुग्णालयासह तेथील डॉक्टर दोषी असल्याचा गंभीर आरोप पाचही भावंडांनी केला असून शवविच्छेदन अहवाल हातात आल्यानंतर कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सदर महिला दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी शेतात काम करीत होती व रेमडेसिव्हीर देईपर्यंत सर्वांशी व्यवस्थित बोलत होती व ‘मला काहीच झाले नाही, उगाच का दवाखान्यात ठेवले आहे, मला घरी घेवून चला’ असे आपल्या मुलांना वारंवार सांगत होती. असे असतांनाही तिचा मृत्यू धक्कादायक असून रुग्णालयाच्या हलगर्जीपणामूळेच आमच्या आईचा जीव गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सदर रुग्णालयाबाबत यापूर्वीही अनेकदा तक्रारी आल्या आहेत, मात्र आजवर त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. आता तर थेट रुग्णालयातील कर्मचार्यांच्या लिगर्जीपणातून एका महिलेचा जीव गेल्याचा गंभीर आरोप झाला आहे. संगमनेरची वैद्यकीय यंत्रणा या घटनेकडे आता कोणत्या नजरेतून बघते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आपणास न्याय मिळावा यासाठी गुंजाळवाडी पठारावरील ‘त्या’ पाचही भावंडांनी आता कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला असून न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे ठामपणे सांगीतले आहे.