सणांच्या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या बाजारपेठेत तोबा गर्दी! सरासरी रुग्णसंख्येत भर पडत असतानाही वाहतूक पोलीस वगळता प्रशासनाचे दुर्लक्ष..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट पूर्णतः आटोक्यात येण्यापूर्वीच नागरिकांचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष ठळकपणे समोर येवू लागले आहे. त्यातूनच स्वातंत्र्य दिनापासून निर्बंधातून मुक्त झालेले काही व्यापारी आणि नागरिक कोविड मुक्त झाल्यागत वावरत असल्याचे चिंताजनक चित्रही आता हळूहळू समोर येवू लागले आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर त्याची पहिली झलक आज संगमनेरात बघायला मिळाली असून शनिवारचा बाजार भरवण्यास मनाई असली तरीही नियमितपणे भरणार्‍या बाजाराएवढीच गर्दी आज शहरातील सर्वच रस्त्यांवर पहायला मिळाली. ग्रामीणभागातून खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक संगमनेरात आल्याने बहुतेक मुख्यमार्गांवर वारंवार वाहतूकीचा खोळंबा होत होता. वाहतूक सुरळीत करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांशिवाय बाकीच्या प्रशासनाचे अस्तित्त्व मात्र शून्य पाहून पुढच्या धोक्याचा स्पष्ट इशाराही मिळत होता. पहिल्या संक्रमणानंतर आलेल्या गणेशोत्सवानेच राज्यात दुसरी लाट आणली होती, आताही तशीच स्थिती अनुभवयाला मिळत आहे. त्यातच संगमनेर तालुक्यातील सरासरीचा वेग पाहता तालुका पुन्हा एकदा चिंतेच्या छायेखाली येण्याची भीती निर्माण झाली आहे.

राज्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट ओसरत आहे. दररोज समोर येणार्‍या आकडेवारीतून ही गोष्ट स्पष्ट दिसत असतांना अहमदनगर जिल्ह्यात मात्र दररोज सरासरी आठशेहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. त्यातही संगमनेर तालुका आघाडीवर असून तालुक्यातून जिल्ह्यात सर्वाधिक सरासरीने म्हणजे तब्बत 131 रुग्ण दररोज या गतीने रुग्ण आढळत आहेत. संक्रमणाच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या पारनेर तालुक्याचा सरासरी रुग्ण समोर येण्याचा वेग 96 आहे. यावरुन आजही तालुक्यातील कोविड स्थितीचा सहज अंदाज बांधता येतो. असे असतानाही जिल्ह्याच्या एकूण सरासरीनुसार उपलब्ध ऑक्सिजन खाटांची संख्या आणि एकूण सरासरी रुग्णगती यावरुन राज्यासह जिल्ह्यालाही निर्बंधातून ‘स्वातंत्र्य’ मिळाले. अर्थात जिल्ह्यातील कोपरगाव, अहमदनगर महापालिका क्षेत्र, श्रीरामपूर, राहाता, जामखेड, राहुरी व नेवासा या तालुक्यातील रुग्णगतीला मोठ्या प्रमाणात ब्रेक लागलेला आहे. जिल्ह्यात कोपरगाव तालुक्याची सरासरी रुग्णगती सर्वात कमी म्हणजे 20 रुग्ण दररोज इतकी असून ब्रेक लागलेल्या तालुक्यातील नेवाशातून दररोज 42 रुग्ण समोर येतात.

तर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधून रुग्णसमोर येण्याचा वेग अधिक असून त्यात सर्वाधिक 131 रुग्ण दररोज या गतीने संगमनेर तालुक्यातून रुग्ण समोर येत आहेत. तर वाढणार्‍या रुग्णसंख्येतील तालुक्यांच्या गटात पाथर्डीतून सरासरी 50 रुग्ण आढळत आहेत. दुसर्‍या संक्रमणातून सावरण्यापूर्वीच संगमनेर तालुक्याच्या पठारभागात धुमधडाक्यात लग्नसोहळे पार पडले. काही खासगी डॉक्टरांनी परस्पर रुग्णांवर उपचार करुन त्यांना मोकळीक दिल्याने त्रास नसलेल्या रुग्णांनी अक्षरशः हाहाकार माजवला. त्याचा फटका हळुहळु संपूर्ण तालुक्यालाच बसतोय. दररोजच्या रुग्णसंख्येवरुन हे स्पष्टही झाले आहे. त्यामुळे सरासरीनुसार जिल्ह्याला निर्बंधातून मुक्ती मिळाली असली तरीही कोविडच्या संक्रमणातून अजूनही संगमनेरकरांची सुटका झालेली नाही. असे असताना पुन्हा आपण ‘ये रेऽ माझ्या मागल्या..’ प्रमाणे कोविडला निमंत्रण देत आहोत असेच काहीसे चित्र आज संगमनेरच्या बाजारपेठांमध्ये दिसले.

श्रावणमासापासून हिंदू धर्मियांसह मुस्लिम धर्मियांचेही सण-उत्सव सुरु होतात. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध शिथील केले असले तरीही राज्यातील मंदिरांचे टाळे मात्र उघडलेले नाहीत. त्यामागेही धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने नागरिकांची गर्दी होवू नये हा उद्देश होता. मात्र यापुढील काळात रक्षाबंधन, जन्माष्टमी, त्यानंतर पोळा आणि गणेशोत्सव अशा सणांची श्रृंखला असल्याने व हे सगळेच सण मंदिरांशिवायही साजरे केले जात असल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी होणार हे अगदी पहिल्याच सणाला दिसून आले आहे. त्याचे प्रतिबिंब आज संगमनेर शहरातील रस्त्यारस्त्यावर पहायला मिळाले. दुचाकी, चारचाकी अशा वाहनांमधून ग्रामीणभागातील नागरिकांचे लोंढे आज संगमनेरच्या बाजारपेठेत दाखल झाले. यातून विशिष्ट दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी नियमांचे पालन तर त्याहून अधिक ठिकाणी उल्लंघनही दिसून आले. मात्र त्याला रोखण्यासाठी कोणत्याही यंत्रणेचे अस्तित्त्व शहरात कोठेही दिसून आले नाही. फक्त वाहतूक पोलीस मात्र नेमून दिलेल्या जागी वाहतूकीचे प्रामाणिकपणे संचालन करताना आढळून आले.

मागील वर्षी पहिले संक्रमण आटोक्यात येत असतांना जन्माष्टमी पाठोपाठ गणेशोत्सव आणि मोहरमचा सण आला. त्यासाठी कोविडकडे दुर्लक्ष करुन बाजारपेठांमध्ये तोबा गर्दी उसळली. त्याचे परिणाम सप्टेंबरमध्ये पहिल्या संक्रमणातील सर्वोच्च 1 हजार 561 रुग्ण समोर आले. त्यावरुन प्रशासनाने दिवाळीनंतर दुसर्‍या संक्रमणाचा अंदाज गृहीत धरला होता. मात्र प्रत्यक्षात दुसरे संक्रमण सुरु व्हायला मार्च उजेडला. गेल्या वर्षीप्रमाणे आत्ताही तशीच स्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली असून बाजारपेठांमध्ये गर्दी उसळत आहे. शासनाकडून सर्व व्यापार खुले झाले असले तरीही कोविड नियमांची कोटकोरपणे सक्ती करण्याचे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे वेळीच या गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. अन्यथा आज शिथील झालेले निर्बंध उद्या आपल्याच चुकांमुळे पुन्हा कठोर होण्यास वेळ लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *