संगमनेर-अकोले तालुक्याला मिळाला आज मोठा दिलासा! जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही आज घट; रुग्णवाढीची सरासरी मात्र कायम..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या तीन दिवसांपासून वाढीव रुग्णसंख्येचे धक्के देणार्‍या कोविडने आज संगमनेर व अकोले तालुक्याला काहीसा दिलासा दिला आहे. बुधवारी दोन्ही तालुक्यात उच्चांकी रुग्ण समोर आल्यानंतर आज मात्र अचानक रुग्णसंख्येचा डोंगर ढासळल्याचे दिसून आले. मात्र शासकीय प्रयोगशाळेकडून आज दोन्ही तालुक्यातील स्राव चाचणी अहवाल अप्राप्त असल्याने आज मिळालेला दिलासा तात्पूरता असल्याचेही स्पष्ट झाले. आज संगमनेर तालुक्यातील पंधरा तर अकोले तालुक्यातील अवघ्या पाच जणांचे अहवाल संक्रमित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या आता 7 हजार 557 वर पोहोचली आहे.


गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही ठराविक तालुक्यांमध्ये कोविडच्या दुसर्‍या संक्रमणाने चांगलाच वेग घेतल्याचे समोर आले. त्यामुळे एकवेळ संक्रमण संपले असे वाटत असतांना मार्चच्या सुरुवातीपासूनच कोविड बाधितांच्या संख्येने वेग धेण्यास सुरुवात केली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येवू लागल्याने प्रशासनाची अवस्थाही गोंधळल्यासारखी झाल्याचे निरीक्षणही यातून समोर आले. त्यातच बुधवारी (ता.17) जिल्ह्यात विक्रमी 611 रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात कोविडचे संकट अधिक गहिरे झाल्याची चिंताही निर्माण झाली. मात्र आज तांत्रिक कारणांनी का होईना जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला असून रुग्णसंख्येचा आलेख आज काहीसा खाली येवून कालच्या तुलनेत आज जिल्ह्यातून केवळ 456 रुग्ण समोर आले.


आज सर्वाधीक बाधित आढळलेल्या क्षेत्रांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्र 124 रुग्ण, नगर ग्रामीण 19 रुग्ण, कोपरगाव 74 रुग्ण, श्रीरामपूर 53 रुग्ण, राहाता 49 रुग्ण, पारनेर 25 रुग्ण, नेवासा 17 रुग्ण, संगमनेर, राहुरी व श्रीगोंदा प्रत्येकी 15 रुग्ण, शेवगाव 13 रुग्ण, पाथर्डी 12 रुग्ण, कर्जत 11 रुग्ण, जामखेड 6 रुग्ण, अकोले 5 रुग्ण, लष्करी क्षेत्र एक रुग्ण आणि बाह्य जिल्ह्यातील दोन रुग्ण अशा एकूण 456 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले. बाह्य जिल्ह्यातील रुग्ण वगळता 1 मार्चपासून आत्तापर्यंत जिल्ह्यात 6 हजार 532 रुग्ण समोर आले आहेत. त्यात अहमदनगर महापालिका व ग्रामीण क्षेत्रातून सर्वाधीक 2 हजार 422, राहाता 767, संगमनेर 748, कोपरगाव 479, श्रीरामपूर 323, शेवगाव 269, पारनेर 264, राहुरी 218, अकोले 203, नेवासा 193, पाथर्डी 179, श्रीगोंदा 153, कर्जत 133, जामखेड 102 व लष्करी क्षेत्र व लष्करी रुग्णालय मिळून 79 रुग्ण समोर आले आहेत.
आज संगमनेर तालुक्यातील पंधरा जणांचे स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

प्राप्त झालेले सर्व अहवाल खासगी प्रयोगशाळेचे असून आज शासकीय प्रयोगशाळेकडून एकही अहवाल प्राप्त न झाल्याने गेल्या 1 मार्चपासून उंचावलेली तालुक्याची सरासरी आज काही प्रमाणात खाली आली आहे. आजच्या अहवालात शहरातील केवळ तिघांचा समावेश असून सदरचे तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. त्यात पंपींग स्टेशन परिसरातील 30 वर्षीय महिला व 9 आणि 5 वर्षीय मुलींचा समावेश आहे. तर ग्रामीण क्षेत्रातील रायतेवाडी येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38 वर्षीय तरुण व 33 वर्षीय महिला, राजापूर येथील 43 वर्षीय तरुण, कनोली येथील 33 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 28 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 45 वर्षीय महिला, खांबे येथील 34 वर्षीय महिला, सांगवी येथील 27 वर्षीय महिला, झोळे येथील 32 वर्षीय तरुण, डिग्रस मांलुजे येथील 30 वर्षीय तरुण व झरेकाठी येथील 33 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.


तर अकोले तालुक्यात काल उच्चांकी 25 रुग्ण समोर आल्यानंतर त्यात आज पाच पटीने घट झाल्याचे समोर आले आहे. आज खासगी प्रयोगशाळेचे चार आणि शासकीय प्रयोगशाळेचा अवघा एक असे एकूण पाच अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात अकोल्यातील गणेश सोसायटी (शाहुनगर) परिसरातील 54 वर्षीय इसम, गणोरे येथील 73 वर्षीय महिला, कोतुळ येथील 44 वर्षीय इसम, ब्राह्मणवाडा येथील 48 वर्षीय महिला व बेलापूर येथील 85 वर्षीय वयोवृद्धाचा समावेश आहे.

Visits: 24 Today: 2 Total: 115243

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *