रात्री उशिरापर्यंत ‘कव्वाली’चे भोंगे सुरु ठेवणे आले अंगलट! सय्यदबाबा ऊर्स कमिटीवर गुन्हा दाखल; संगमनेर पोलिसांची कारवाई
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशातील वाढत्या ध्वनी प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठी दोन दशकांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक पातळीवर वाद्य वाजवणार्या मर्यादा आणल्या होत्या. तेव्हापासून देशभरात रात्री 10 ते पहाटे सहा या कालावधीत कोणत्याही प्रकारची वाद्ये वाजवण्यास पूर्णतः मनाई आहे. मात्र असे असतांनाही आजही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करुन अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पिकर व तस्सम प्रकारच्या वाद्यांचा दणदणाट सुरुच आहे. असाच प्रकार संगमनेरातही घडला असून सर्वधर्मीय हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सय्यदबाबा यांच्या यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात रात्री उशिरापर्यंत ‘भोंगे’ वाजवून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सय्यदबाबा ऊर्स कमिटीच्या विश्वस्तांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विविध जाती-धर्माच्या लोकांची भरमार असलेल्या संगमनेरात अनेक प्राचिन देवालयांसह मशिदी, दर्गे, गुरुद्वारा व चर्च यांचीही मोठी संख्या आहे. यातील बहुतेक धार्मिक स्थळांवर दरवर्षी वार्षिक उत्सवांचेही आयोजन केले जाते. या निमित्ताने काही ठिकाणी सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसह मनोरंजनात्मक कार्यक्रम, कुस्तीचे हगामे असेही उपक्रम राबविले जातात. संगमनेरातील सय्यदबाबा चौकातील सय्यदबाबांच्या दर्ग्यावरही शहर व परिसरातील सर्वधर्मीय भाविकांची मोठी श्रद्धा आहे. याठिकाणी दरवर्षी भरणार्या यात्रेचेही मोठे वैशिष्ट्य आहे.
दोन वर्ष कोविड संक्रमणाच्या भयाखाली गेल्यानंतर यावर्षी देशभरात अशाप्रकारच्या यात्रा-जत्रा, ऊर्स व धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल बघायला मिळत आहे. त्यामुळे यंदा संगमनेरातील सय्यदबाबा ऊर्स कमिटीनेही या वार्षिक उत्सवाची जय्यत तयारी केली होती. यावर्षीच्या उत्सवात विविध धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. जवळपास आठ दिवस सय्यदबाबा चौकाच्या विस्तीर्ण परिसरात भारलेल्या यात्रेत हजारो नागरिकांची गर्दीही बघायला मिळाली.
या कार्यक्रमादरम्यान बुधवारी (15 फेब्रुवारी) सय्यदबाबा चौकात कव्वालीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पोलिसांनी परवानगी देताना रात्री 10 वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचे वाद्य अथवा स्पीकर वाजवण्यास मनाई केली होती. मात्र असे असतानाही सय्यदबाबा ऊर्स कमिटीने कायद्याकडे व सर्वोच्च न्यायालयाने बजावलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत स्पीकर वाजवण्याची वेळेची मर्यादा संपल्यानंतर कव्वालीचा कार्यक्रम सुरु करुन तो गुरुवारी (16 फेब्रुवारी) पहाटे पावणेदोन वाजेपर्यंत सुरु ठेवला, त्यातून कायद्याचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाला.
त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेत कायदा मोडणार्या ऊर्स कमिटीवर कायद्याचा बडगा उगारला असून पोलीस शिपाई सचिन ऊगले यांच्या फिर्यादीवरुन सय्यदबाबा ऊर्स कमिटीचे सदस्य अमजद इब्राहीम पठाण उर्फ अन्नू व त्याचे सहकारी, आफताब अमीनोद्दीन शेख, मुदस्सरअली मुस्ताकअली जहागिरदार, अन्सार मकबुल सय्यद, जमीर नजीर शेख, मुन्नवर बशीर कुरेशी, शरीफखान रशीदखान पठाण, शौकत फकीरमुहम्मद शेख, साजिद गुलाब शेख व जमीर जानी शेख या विश्वस्तांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने धार्मिक व खासगी उत्सवात रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर वाजवणार्यांचे धाबे दणाणले आहेत.