दूध दराबाबत मंत्रिमंडळ स्तरावर कारवाई सुरू ः डॉ.नवले

दूध दराबाबत मंत्रिमंडळ स्तरावर कारवाई सुरू ः डॉ.नवले
नायक वृत्तसेवा, अकोले
दूध उत्पादकांच्या दुधाला किमान 30 रुपये दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत याबाबत मंत्रिमंडळ स्तरावर कारवाई सुरू करण्यात आली असून लवकरच सरकार दूध उत्पादकांना दिलासा देईल, असे संकेत सरकारच्यावतीने दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीला देण्यात आले आहेत, अशी माहिती किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी दिली.


किसान सभा व संघर्ष समितीच्यावतीने 20 जुलै, 21 जुलै व 1 ऑगस्ट रोजी राज्यात करण्यात आलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या मार्फत जाहीर केले होते. त्यानुसार सरकारने आश्वासन पाळावे व दुधाला प्रतीलिटर 30 रुपये दराची हमी द्यावी, 10 रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करावे व पावडर निर्यातीसाठी प्रतीकिलो 50 रुपये अनुदान द्यावे. या मागण्यांसाठी किसान सभा व संघर्ष समिती सरकारच्या संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही वस्तुस्थिती दर्शविणारे निवेदन देऊन संघर्ष समितीने दूध प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या निवेदनाची दखल घेत किसान सभेला सूचित केले आहे. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्याकडेही किसान सभा व संघर्ष समिती सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यामुळे सरकारने दूध उत्पादकांच्या संयमाची अधिक परीक्षा न पाहता दूध दराबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा किसान सभा व संघर्ष समितीचे डॉ.अशोक ढवळे, डॉ.अजित नवले, उमेश देशमुख, धनंजय धोरडे, अनिल देठे, शांताराम वाळुंज, महेश नवले, डॉ.संदीप कडलग, विजय वाकचौरे, अशोक आरोटे, गुलाब डेरे, कारभारी गवळी, सुरेश नवले, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, अशोक सब्बन, लालू दळवी, विलास नवले, विलास आरोटे, शरद देशमुख, सोमनाथ नवले, दिलीप शेणकर, लक्ष्मण नवले आदिंनी व्यक्त केली आहे.

Visits: 7 Today: 1 Total: 115602

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *