अज्ञात आजाराने पक्षी मरण्याची श्रृंखला संगमनेरातही पोहोचली! दैनिक नायकच्या माहितीनंतर तालुका पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पठारापाठोपाठ अज्ञात कारणाने पक्षी मरण्याची श्रृंखला संगमनेर शहरातही पोहोचली आहे. शहरालगतच्या गंगामाई घाट परिसरात आज मृत होऊन पडलेला कावळा आढळून आला. पठारावर सापडलेला कावळा तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता. शुक्रवारी रात्री त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यातून त्याला ‘एच-5’ची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर लागलीच शहरातील गंगामाई परिसरात अशाच अज्ञात कारणाने मृतावस्थेतील कावळा आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, गेल्या अंदाजे दोन दिवसांपूर्वी शहरालगतच्या गंगामाई घाट परिसरात एक कावळा मृत असल्याचे तेथे फिरायला जाणार्या काही नागरिकांच्या लक्षात आले. या घटनेला दोन दिवस उलटले असताना एका जागरूक नागरिकाने याबाबत दैनिक नायकला माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पाहिले असता सदरचा कावळा अद्यापही नव्याने वृक्षारोपण झालेल्या एका आंब्याच्या रोपाजवळ पडून असल्याचे दिसले. याच परिसरात कावळ्यांची मोठी रेलचेल असते. संगमनेर शहरातील बहुतेक सर्व दहाव्याचे विधी याच परिसरात होत असल्याने या भागात कावळ्यांचा वावर नेहमीच मोठ्या प्रमाणात असतो.
घारगाव येथील कावळा बर्ड फ्ल्यू या आजाराने मेलेला नसला तरीही, ज्या अज्ञात कारणाने त्याचा मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती समोर येण्याची गरज आहे. गंगामाई परिसरात दररोज शेकडो लोक फिरण्यासाठी येतात. या परिसरात मरून पडलेल्या कावळ्याची चर्चा या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पसरल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची गरज आहे. सदर घटनेबाबत प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर व प्रशासन अधिकारी श्रीनिवास पडाल या सर्वांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली असता, त्यांनी तत्काळ पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकार्यांचे पथक तेथे पाठवण्याची व्यवस्था केली.
गेल्या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये पठार भागातून पाच-सहा कावळे अचानक मृत होऊन पडल्याचे वृत्त आल्याने संपूर्ण तालुक्यात बर्ड फ्ल्यू या पक्षातील आजारांचा प्रादुर्भाव सुरू झाला की काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र वन विभागाने मृत झालेला एक कावळा तपासणीसाठी पुण्याला पाठवला होता. शुक्रवारी रात्री त्याचा अहवाल प्राप्त झाला, त्यात पक्ष्यांमध्ये आढळणार्या ‘एच-5’ या विषाणूंचा त्याला संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर दुसर्याचं दिवशी तेथून 40 किलोमीटर दूर असलेल्या संगमनेर शहरात मृत कावळा आढळल्याने, पक्ष्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषाणूंचा प्रादुर्भाव झाला आहे व तो का वाढत आहे याबाबत प्रशासनाकडून खुलासा होण्याची गरज आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्या सूचनेवरुन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा शिंदे यांनी गंगामाई घाट परिसरातील त्या परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी सदर कावळ्याची अवस्था पाहिली असता त्याचे शरीर नाश पावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याची तपासणी होणे अशक्य असल्याने सदर कावळा परिसरात एका ठिकाणी खड्डा घेऊन दफन करण्यात आला. त्याच्या सोबतच शहरातील कावळे का मृत्यूमुखी पडत आहेत याचे उत्तरही त्या कावळ्यासोबत जमिनीत दफन झाले.