कोट्यवधी रुपयांना गंडा; गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत! सिमेंट व स्टील कमी भावात घेण्याचे आमिष पडले महागात
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव, राहाता, येवला, औरंगाबाद आदी तालुक्यांसह महाराष्ट्रात सिमेंट व स्टील कमी भावात देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेला ठग मोबाईल स्वीच ऑफ करून पसार झाला आहे. या प्रकाराने गुंतवणूकदार चिंतेत असतानाच, बुधवारी (ता.4) इचलकरंजी येथे या ठगाचा चालक एका मोठ्या गुंतवणूकदाराच्या हाती लागला. याची वार्यासारखी माहिती कोपरगाव तालुक्यात समजताच गुंतवणूकदारांच्या अपेक्षा काहीशा पल्लवीत झाल्या आहेत.
मूळचा कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या एका ठगाने कोपरगाव येथे दहा वर्षांपासून वास्तव्य केले. यामध्ये त्याने अनेक बडे शेतकरी, व्यावसायिक, बिल्डर्स यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले. अनेकांचा विश्वास संपादन करत त्याने स्टील व सिमेंट कमी भावात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची माया जमवत ठगगिरी केली. यामध्ये अनेक लोकांचे पैसे अडकले असून त्यांच्यावर आता कपाळाला हात मारून घेण्याची वेळ आली आहे. अनेकांनी या ठगाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून त्याने मोबाईल स्वीच ऑफ केला असल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. मात्र काल या ठगाचा ड्रायव्हर एका गुंतवणूकदाराच्या ताब्यात सापडल्याने आपले पैसे मिळतील या अपेक्षेने कोपरगाव येथील गुंतवणूकदार इचलकरंजी येथे एका गुंतवणूकदाराच्या संपर्कात आहेत.
अगदी पन्नास टक्के कमी किंमतीवर स्टील व सिमेंट उपलब्ध झाल्याने अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला. ही साखळी त्याने चार-पाच तालुक्यात तयार केली. अनेक स्टील व सिमेंट व्यापार्यांनीही यामध्ये पैसे गुंतवले आहे. इचलकरंजी येथे या चालकाची चौकशी झाल्यानंतर हा ठग या चालकाला सोडून देत बंगळूरू मार्गे विमानाने पळाला असल्याचे समजते.
कोपरगाव तालुक्यातील अनेकांनी स्टील व सिमेंट कमी भावात खरेदी करण्याच्या नावाखाली पैसे गुंतवले आहेत. दर दोन दिवसांनी याबाबत पोलीस ठाण्याकडे चौकशी करण्याच्या नावाखाली फसलेले गुंतवणूकदार येतात. पुराव्यांची जुळवाजुळव करत फसवणूक करणार्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
– वासुदेव देसले (पोलीस निरीक्षक, कोपरगाव शहर)