संक्रमणाची गती वाढल्याने संगमनेरकरांच्या चिंतेत पडली भर! डिसेंबरने रुग्णवाढीचा वेग वाढवत घेतला शहरातील एका वृद्धाचा बळी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नोव्हेंबरच्या दुसर्या पंधरवड्यात वाढलेल्या कोविड संक्रमणाने डिसेंबरच्या पहिल्याच दिवसापासून आणखी गती घेतली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत सरासरी 38 रुग्ण दररोज या सरासरीने वाढणारी रुग्णसंख्या आता 43 रुग्ण दररोज या गतीवर आल्याने या महिन्यात पुन्हा एकदा रुग्णवाढीचा उच्चांक होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्यातच वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबरच्या शेवटच्या सत्रात रुग्णवाढीची शक्यता वर्तविल्याने चिंतेत भर पडली आहे. गुरुवारीही तालुक्यातील रुग्णवाढीची गती कायम राहताना तब्बल 45 रुग्ण समोर आले. त्यामुळे तालुक्याने बाधितांचे 53 वे शतकही ओलांडले असून रुग्णसंख्या 5 हजार 326 वर जावून पोहोचली आहे. तर या महिन्याने रुगवाढीला गती देण्यासोबतच नायकवाडपुर्यातील एका वृद्धाचा बळीही घेतल्याने कोविडने बळी गेलेल्या शासकीय आकड्याची संख्याही आता 46 वर पोहोचली आहे.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच तालुक्यातील कोविडचे संक्रमण आटोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यातच सुरुवातीच्या पंधरवड्यात शहरी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात खालावल्याने शहरातील संक्रमण पूर्णतः आटोक्यात आल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. मात्र 11 नोव्हेंबरपासून संगमनेरच्या बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीच्या तौबा गर्दी झाल्याने त्याचे दुष्परिणाम समोर येण्यासारखी स्थिती निर्माण झाली आणि 16 नोव्हेंबरपासून शहरासह ग्रामीणभागातील रुग्णवाढीनेही वेग घेण्यास सुरुवात केला. सलग पंधरा दिवस सरासरी 38.27 रुग्ण दररोज या वेगाने रुग्णवाढ झाल्यानंतर गणेशोत्सवाप्रमाणे कोविडचा प्रभाव कमी होईल असे वाटत असतांना डिसेंबर महिना 49 रुग्णसंख्या सोबत घेवूनच उगवला, आणि त्यानंतरच्या दोन दिवसांनी तोच कित्ता गिरवल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येती गती पुन्हा एकदा पुर्ववत झाली आहे.

बुधवारी किंचित कमी झालेल्या रुग्णगतीत गुरुवारने भर घातली. रॅपिड अँटीजेन चाचणीतील 31 निष्कर्ष आणि खासगी प्रयोगशाळेच्या 14 अहवालातून शहरातील नऊ जणांसह तालुक्यातील एकूण 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील घोडेकर मळा परिसरातील 43 वर्षीय तरुण, शिवाजीनगर भागातील 38 वर्षीय महिलेसह 19 वर्षीय तरुण, नगर पालिका परिसरातील 60, 50 व 43 वर्षीय महिला, मालदाड रस्त्यावरील 65 वर्षीय महिला व मेनरोडवरील 55 वर्षीय इसमासह 18 वर्षीय तरुण अशा शहरातील एकूण नऊ जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे.

त्यासोबतच तालुक्यातील आश्वी खुर्द येथील 35 वर्षीय तरुण, झोळे येथील 40 वर्षीय महिलेसह 21 व 19 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 55 व 42 वर्षीय महिला, नांदूर खंदरमाळ येथील 35 व 21 वर्षीय महिला, खांडगाव येथील 48 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला, देवगाव येथील 65 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील 55 वर्षीय इसम, धांदरफळ खुर्दमधील 23 वर्षीय महिला, धांदरफळ बु.मधील 35 वर्षीय तरुण, राजापूर मधील 53 व 45 वर्षीय महिलांसह 48 वर्षीय इसम आणि 34 व 18 वर्षीय तरुण. घुलेवाडी येथील 52, 39 व 38 वर्षीय महिलांसह 42 वर्षीय दोन तरुण, गुंजाळवाडी शिवारातील लक्ष्मीनगर येथील 17 वर्षीय तरुण, गोल्डन सिटीतील 57 वर्षीय इसमासह 50 वर्षीय महिला आणि 26 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 58 वर्षीय इसम, लोहारे येथील 37 वर्षीय तरुण, निमगाव बु. येथील 55 वर्षीय महिला, चिखलीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 44 वर्षीय तरुण, डेरेवाडी येथील 38 वर्षीय तरुण व जवळे कडलग येथील 38 वर्षीय तरुण अशा एकूण 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने तालुक्याने गुरुवारी बाधितांचे 53 वे शतक ओलांडून 5 हजार 326 रुग्णसंख्या गाठली आहे.

शहरातील एका कुटुंबाकडे दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात पाहुणे आले होते. त्या दरम्यानच परिसरातील एका महिलेला संक्रमण झाले व चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांची सुटकाही झाली. त्यानंतर वरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी पै-पाहुण्यांसह ‘त्या’ महिलेच्या घरी जावून त्यांची विचारपूस केली माघारी फिरताना कोविडचा वाणोळा सोबत आणल्याचेही समोर आले आहे. शासन व प्रशासनाकडून याबाबत वारंवार सूचना दिल्या जात असतांना सामान्य नागरिक त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचे यावरुन अगदी स्पष्ट होते.

नोव्हेंबरच्या दुसर्या पंधरवड्यात रुग्णवाढीची गती वाढतानाच मृतांच्या संख्येतही चार रुग्णांची भर पडली होती. मागील महिन्याचाच कित्ता गिरवित चालू महिन्याने पहिल्याच दिवशी 49, दुसर्या दिवशी 34 तर तिसर्या दिवशी 45 असे एकूण सरासरी 42.67 च्या गतीने 128 रुग्णांची भर घातली आहे. त्यासोबतच नायकवाडपुर्यातील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या रुपाने महिन्यातील पहिला कोविड बळीही गेला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येसोबतच मृतांच्या संख्येतही भर पडली आहे. या इसमाच्या रुपाने तालुक्यातील कोविडचा 46 वा बळी गेला आहे.

