नकली पुस्तके छापणारांविरोधात विश्वास पाटलांची मोहीम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मराठी साहित्य विश्वाला कोरोनामुळे मागील दीड वर्षांत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी पुस्तकांची दुकाने सुरु झाली असली तरी अद्याप साहित्य व्यवहाराला फारशी गती आलेली नाही. अशातच पुणे, मुंबई, नाशिक सारख्या महानगरात मराठीतील गाजलेल्या पुस्तकांच्या नकली प्रती अतिशय कमी दरात विकल्या जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील यांनी म्हटले आहे.
आज शिवाजी सावंत किंवा रणजीत देसाई यांच्यासारख्या महान लेखकांच्या कुटुंबियांचे चरितार्थाचे साधन या पुस्तकांच्या विक्रीतून मिळणारी रॉयल्टी हेच आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचा कागद, निकृष्ट छपाई, निकृष्ट बाईडिंग आणि कोणताही कर भरावा लागत नसल्याने नकली पुस्तके छापणारी मंडळी अतिशय कमी किंमतीत गाजलेली पुस्तके विक्री करीत आहेत. अनेक लेखकांनी मराठी साहित्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचले आहे आजही कर्ण समजून घेण्यासाठी मृत्युंजय किंवा राधेय, संभाजी महाराजांचे जीवन समजून घेण्यासाठी संभाजी किंवा छावा अशा पुस्तकांची नावे डोळ्यासमोर येतात. अशा महापुरुषांचे जीवन समजून घेण्यासाठी नकली पुस्तके खरेदी करणे योग्य आहे का? असा सवाल करून विश्वास पाटील यांनी वाचकांना नकली पुस्तके खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. यापुढे नकली पुस्तके विकणारे, ते छापणारे, अशा पुस्तक विक्रीसाठी आपली जागा उपलब्ध करून देणारे या सर्वांविरोधात लेखक व प्रकाशकांच्यावतीने कायदेशीर कारवाईची सामूहिक मोहीम उघडणार आहे असेही पाटील यांनी सांगितले.