पावसाळ्यात चंदनापुरी घाट वाहनचालकांसाठी ठरतोय धोकादायक! लोखंडी जाळ्या भेदून दरडी थेट येताहेत महामार्गावर; कंपनीचे मात्र दुर्लक्ष

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात पावसाळ्यात दरवर्षी दरडी कोसळतात. या परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगरदर्‍या असल्याने कायमच निसर्गाशी दोन हात करावे लागतात. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात देखील दरडी कोसळू नये म्हणून संबंधित महामार्ग बांधकाम कंपनीने येथे डोंगरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने लोखंडी संरक्षक जाळ्या लावलेल्या आहेत. परंतु, असे असतानाही पावसाळ्यात संरक्षक जाळ्या भेदून दरडी महामार्गावर कोसळतात. त्यामुळे हा चंदनापुरी घाट पावसाळ्यात वाहनचालकांसाठी धोकेदायक ठरत असल्याचे वारंवारच्या घटनांवरुन अधोरेखित होत आहे.

पुणे व नाशिक महानगरांना जोडणार्‍या महामार्गाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. दररोज हजारो प्रवासी व मालवाहतूक वाहने ये-जा करतात. या महामार्गाची निर्मिती करणारी कंपनी वाहनांकडून टोलही वसूल करते. मात्र, त्या बदल्यात सुविधा पुरविण्यात कमी पडत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. नवीन महामार्ग बांधताना जुना चंदनापुरी घाट बंद करुन मोठ-मोठे डोंगर तोडून नवीन घाट तयार करण्यात आला. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात पाणी झिरपून डोंगरांच्या दरडी खिळखिळ्या होतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने डोंगरांना लावलेल्या संरक्षक लोखंडी जाळ्यांना भेदून दरडी महामार्गावर कोसळतात. दरवर्षी असा प्रकार घडूनही संबंधित कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

वास्तविक पाहता वाहनांकडून टोल वसूल करणार्‍या कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे गरजेच्या असूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. अनेकदा दरडी कोसळून वाहतूक दुसर्‍या बाजूने वळविण्याची नामुष्की देखील ओढावली होती. या दरडी कोसळू नये म्हणून कंपनीने कायमस्वरुपी तोडगा काढणे गरजेचे आहे. मात्र, कंपनी झोपेचे सोंग घेत आहे. यातून मोठी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार राहील, असा प्रश्न परिसरातील नागरिकांसह वाहनचालक विचारत आहे.

Visits: 94 Today: 1 Total: 1115091

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *