लोकपंचायतची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी थोरात उपाध्यक्षपदी प्रा. जाधव, सचिवपदी फल्ले तर खजिनदारपदी राऊत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील लोकपंचायत संस्था गेली तीस वर्षे शाश्वत विकासाच्या संदर्भात अहमदनगर जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करत आहे. प्रामुख्याने दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसंधारण, आदर्श गाव योजना, अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम, मुला-मुलींसाठी खेळघरे, किशोर-किशोरी शिबिरे, महिला राजसत्ता आंदोलन, महिलांचे बचत गट त्यातून व्यवसाय निर्मिती व विक्री व्यवस्था उभी करण्यात आली आहे. या संस्थेची नुकतीच विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये संस्थेच्या विश्वस्तांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी विजय थोरात, उपाध्यक्षपदी प्रा. शाहीर तुळशीराम जाधव, सचिवपदी संजय फल्ले तर खजिनदारपदी सीताराम राऊत यांची निवड करण्यात आली आहे.

लोकपंचायत वनपंचायतच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला दिशादर्शक ठरेल असा सामूहिक वन हक्क व वैयक्तिक वन हक्काचा अधिकार अकोले तालुक्यातल्या आदिवासी बांधवांना मोठा संघर्ष व समन्वय करून मिळवून दिलेला आहे. आदिवासींच्या विविध हक्कांसाठी लोकपंचायतचे कार्यकर्ते सक्रीय आहेत. पारंपरिक देवराया जतन व संवर्धन करण्यासाठी लोकपंचायतने विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः आदिवासी व ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी व्होक्सवॅगन कंपनीच्या सहकार्याने कुरकुंडी-घारगाव (ता. संगमनेर) येथे ग्रामीण तंत्रशिक्षण संस्थेच्या (आरटीटीआय) माध्यमातून आयटीआय कॉलेज चालवले जात आहे. लोकपंचायतचा जाणीव-जागृती कलामंच महाराष्ट्रातील नामवंत कलामंच म्हणून गौरविला जातो. कलामंचाच्या माध्यमातून सेंद्रीय शेती, गावरान बियाणे या विषयांसह प्रबोधनाचे विविध शेकडो प्रयोग महाराष्ट्रात झालेले आहेत. आजही हा कलामंच सक्रीय आहे. लोकपंचायत संस्थेच्यावतीने विविध विषयांवर पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.

कोरोना काळात संस्थेच्यावतीने संगमनेर व अकोले तालुक्यात अजीम प्रेमजी ट्रस्टच्या सहकार्यातून दोन हजार कुटुंबियांना किराणा किटचे वाटप तर दोन्ही लॉकडाऊनच्या काळात दैनंदिन अन्नाचे पॅकेट पुरविण्यात आले. तसेच गावपातळीवर खर्‍या अर्थाने कोरोनाला हरवण्याचं काम करणार्‍या आशा, अंगणवाडी व आरोग्य कर्मचारी अशा 800 जणांना स्व-सुरक्षा साहित्य किट वाटण्यात आले. हेच काम पुढे नेताना ग्रामीण भागातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका ग्रामीण रुग्णालय याठिकाणी रुग्णांच्या सोयीसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. अशा मूलभूत विषयांसह विविध क्षेत्रांत काम करणारी लोकपंचायत संस्था सामाजिक क्षेत्रात एक भरीव योगदान देणारी संस्था म्हणून नावलौकिकप्राप्त ठरलेली आहे. अशा या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली.

या सभेमध्ये नव्याने विश्वस्त निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अध्यक्षपदी विजय थोरात, उपाध्यक्षपदी प्रा. शाहीर तुळशीराम जाधव, सचिवपदी संजय फल्ले तर खजिनदारपदी सीताराम राऊत यांची निवड करण्यात आली अरहे. इतर विश्वस्तांमध्ये अ‍ॅड. ज्योती मालपाणी, स्मिता गाडेकर, हनुमंत उबाळे, जुबेर इनामदार, सोपान बंदावणे, अ‍ॅड. गोपीनाथ घुले तर कार्यकारी विश्वस्त म्हणून सारंग पांडे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. प्रदीप मालपाणी यांनी काम पाहिले. संस्थेच्या सल्लागारपदी पद्मभूषण देशपांडे, समीर घोष, प्रदीप मालपाणी, प्रा. उल्हास पाटील, राजाभाऊ अवसक, मंदार वैद्य, दीपश्री चोळके आणि आर्थिक सल्लागार म्हणून सीए. दत्तात्रय खेमनर यांची निवड करण्यात आली.

Visits: 3 Today: 1 Total: 29896

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *