संगमनेरातील मोटारसायकल चोरांना पडली बुलेटची भूरळ! सहा महिन्यात सात गाड्यांची चोरी; पोलिसांनी लावला दोन गाड्यांचा शोध..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महागड्या दुचाकी वाहनांची चोरी होणं हा विषय देशासाठी, राज्यासाठी आणि संगमनेर तालुक्यासाठीही नवा नाही. मात्र जेव्हा दुचाकी चोरांकडून एकाच कंपनीच्या महागड्या गाड्या चोरुन नेल्या जातात तेव्हा आश्चर्य निश्चितच निर्माण होतं. अर्थात संगमनेरात अशाप्रकारचे आश्चर्य सर्वच क्षेत्रातील गुन्हेगारीमध्ये आढळते हा भाग वेगळा. असाच काहीसा विरळा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या दप्तरी नोंद असून गेल्या अवघ्या सहा महिन्यातच शहराच्या विविध भागातून रॉयल इनफिल्ड कंपनीच्या तब्बल सात बुलेट मोटारसायकल्सची चोरी झाली आहे. त्यातील दोन बुलेटचा शोध लावण्यात संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाला यश आले असले तरीही अद्याप पाच गाड्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे बुलेट शौकीनांनी आपल्या वाहनांची स्वतः काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. साधारण वेशभूषा केलेल्या तरुणांकडून अशा प्रकारच्या वाहनांची चोरी होण्याचे प्रकारही सीसीटीव्ही फूटेजद्वारे अनेकदा समोर येते. या उद्योगात सहभागी असणार्या बहुतेक चोरट्यांचा पोलीस दप्तरी इतिहास नसल्याने दुचाकी चोरीच्या घटनेनंतर त्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर नेहमीच असते. त्यातून राज्यात कोठेतरी घडलेल्या चुकीतून एखादा चोरटा हाती लागला की त्याच्याकडूनच अशा प्रकारचे असंख्य गुन्हे उघड होतात आणि त्यातून चोरीच्या गाड्या हस्तगत होतात. आता या घटनांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या टोळ्याही सक्रीय झाल्याने गेल्या काही कालावधीत महागड्या गाड्यांच्या चोर्यांमध्ये सर्वत्र लक्ष्यनीय वाढ झाली आहे.

मागील केवळ सहा महिन्यांचा विचार केल्यास एकट्या संगमनेर शहर हद्दीतून असंख्य दुचाकींसह रॉयल इनफिल्ड कंपनीच्या तब्बल सात ‘बुलेट’ दुचाकी गाड्या चोरीस गेल्या आहेत. त्यातील तीन गाड्या मालदाड रोडवरील विविध वसाहतींमधून गेल्या आहेत हे विशेष. यातील पहिली घटना गेल्यावर्षी 26 ऑक्टोबर रोजी मालदाड रोडवरील गणेश विहार येथील सुरेश जयवंत थोरात यांची पांढर्या रंगाच्या बुलेट (क्र.एम.एच.17/सी.बी.8222) गाडीच्या चोरीपासून सुरु झाली. त्यानंतर महिन्याभराने 4 डिसेंबर रोजी घुलेवाडी शिवारातील साईबन वसाहतीमधून गजेंद्र चंद्रसेन करपे यांची काळ्या रंगाची बुलेट (क्र.एम.एच.17/बी.ई.7384) ही गाडी चोरीस गेली.

त्याच महिन्यात 27 डिसेंबर रोजी चोरट्यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा मालदाड रोडवर वळवित सौभाग्य मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस राहणार्या उमेश दत्तात्रय रहाणे (क्र.एम.एच.17/सी.जी.6794) ही बुलेट चोरुन नेली. नववर्षाच्या सुरुवातीलाच 3 जानेवारी रोजी पुन्हा याच रस्त्यावरील आनंदनगरमधून सुयोग श्रीराम कुलकर्णी यांची (क्र.एम.एच.17/सी.के.1199) ही राखाडी रंगाची बुलेट गाडी चोरीला गेली. त्यानंतर तीन महिने चोरट्यांनी शांतता पाळून 3 मार्च रोजी आपला मोर्चा इंदिरानगरच्या गल्ली क्र.8 मध्ये वळवतांना तेथील संजय मुरलीधर गाडे यांची (क्र.एम.एच.17/बी.एच.8282) बुलेट गाडी चोरुन नेली.

चालू महिन्यातही आत्तापर्यंत शहराच्या गजबजलेल्या परिसरातून अशाच दोन बुलेट चोरीला गेल्या आहेत. त्यातील पहिली घटना 5 एप्रिल रोजी नेहरु चौकातील कानिफनाथ मंदिराजवळ घडली. तेथील औषध दुकानदार अक्षय राजेंद्र शेटे यांची खाकी रंगाची बुलेट (क्र.एम.एच.17/सी.जी.8051) तर चार दिवसांपूर्वी 26 एप्रिल रोजी नवीन नगर रस्त्यावरील कुटे हॉस्पिटलजवळून पिंपळगाव कोंझिरा येथील अशोक माधव करपे यांची आकाशी रंगाची बुलेट (क्र.एम.एच.17/पी.एल.9907) ही गाडी चोरट्यांनी लांबविली. गेल्या अवघ्या सहाच महिन्यांत तब्बल चार लाख सरकारी मूल्याच्या या सात महागड्या रॉयल इनफिल्ड बुलेट गाड्या शहराच्या विविध भागातून लांबविण्यात आल्या आहेत.

या सर्व वाहनांचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी आपल्या ताब्यात घेतला असून आत्तापर्यंत चोरीस गेलेल्या सात बुलेट गाड्यांतील दोन गाड्या पुन्हा हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणी त्यांनी कसून तपास करताना बीड जिल्ह्यातील आष्टी येथील सोमनाथ दिलीप खलाटे व जिल्ह्यातील डोगरगण तालुक्यात राहणार्या संदीप दिलीप कदम या दोघांना अटकही केली. मोटारसायकल चोरीच्या घटना तशा नियमित असताना मागील सहा महिन्यात चोरट्यांनी केवळ रॉयल इनफिल्ड कंपनीच्या बुलेट गाड्याच लक्ष्य केल्याने शहरातून आश्चर्य व्यक्त होण्यासोबतच असंख्य बुलेटप्रेमींच्या मनातील चिंताही वाढवल्या आहेत. वाढत्या बुलेट चोरीच्या घटना लक्षात घेता बुलेट असलेल्या नागरिकांनी स्वतःच आपल्या वाहनाची काळजी घेण्याची गरजही यानिमित्ताने समोर आली आहे.

यापूर्वी संगमनेर शहर व तालुक्याच्या विविध ठिकाणांहून महिंद्र कंपनीच्या पिकअप गाड्या चोरीचे सत्र सुरु झाले होते. एकामागून एक पिकअप चोरीच्या घटना समोर आल्याने पिकअपधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच दरम्यान अकोले पोलिसांनी सोयाबीन चोरांची टोळी पकडल्याने त्यांच्याकडून चोरीचे सोयाबीन वाहतूक करण्यासाठी चोरीच्या पिकअपचा वापर होत असल्याचेही धक्कादायक वास्तव समोर आले होते. त्यानंतर बंद झालेल्या पिकअप चोरीच्या घटनना आता बुलेटचोरीच्या बाबतीत घडू लागल्याने बुलेटप्रेमी चोरट्यांच्या दहशतीत आले आहेत.

