… अन् मोठ्या आवाजाने शेतकरी कुटुंबियांचा उडतो थरकाप! आंबीखालसा ते कोठे खुर्द रस्त्यावरील भानुशी वस्ती येथील घटना

नायक वृत्तसेवा, घारगाव
वेळ मध्यरात्री साडेबाराची अन्… अचानक मोठा आवाज होतो. यामुळे घरातील सर्वांच्या काळजाचा थरकाप उडून क्षणार्धात घराबाहेर येतात. इकडे-तिकडे वीजेर्‍या लावून बघतात तर समोर डोंगराचे मोठमोठे दगड कोसळून रस्त्यावर आलेले होते. ‘वेळ आली होती पण काळ आला नव्हता’ असे म्हणून सर्वांनी निःश्वास सोडला. हा भयावह प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर नुकतीच घडली आहे.

पठारभागातील डोंगरदर्‍यात वसलेल्या आंबीखालसा ते कोठे खुर्द रस्त्यावरील कोठे बुद्रुक हद्दीत भानुशी वस्ती आहे. या वस्ती समोरच वासुदरा नावाचा मोठा डोंगर आहे. शनिवारी (ता. 17) रात्री नेहमीप्रमाणे येथील शेतकरी कुटुंबीय जेवण करून झोपले होते. बरोबर मध्यरात्री अचानक जोराचा आवाज आला. त्यामुळे घरातील अनेकजण क्षणार्धात झोपेतून जागे झाले आणि काय झाले म्हणून वीजेर्‍या घेवून घराबाहेर पडले. काय झाले म्हणून इकडे-तिकडे वीजेर्‍या चमकवून असताना रस्त्याकडे वीजेचा प्रकाश गेला तर समोर मोठमोठे दगड पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. त्यानंतर थेट रस्त्यावर जावून पाहिले असता जवळपास आठ ते नऊ मोठे दगड रस्त्यावर तर काही बाजूला अडकलेले होते. यदा कदाचित काही दगड थेट वस्तीवर धडकले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु ‘वेळ आली होती पण काळ आला नव्हता’ याचा प्रत्यय आला असल्याचे कथन बचावलेले शेतकरी बाळासाहेब वाकळे, बाळासाहेब वाकळे, रामदास वाकळे आदी शेतकर्‍यांनी केले.

संपूर्ण पठारभाग डोंगरदर्‍यांत वेढलेला असल्याने निसर्गाची किमया कायमच अनुभवयास मिळते. आंबीखालसा ते कोठे खुर्द हा डोंगरानजीक असल्याने पावसाळ्यात दरड कोसळून रस्त्यावर येण्याच्या घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. अनेकदा दगड-गोटे वस्तीपर्यंत आलेले होते. याचा अनुभव गाठीशी असल्याने शेतकरी पावसाळ्यात खबरदारी घेऊनच राहतात. आता तरी संबंधित विभागाने याची दखल घेऊन येथील शेतकरी कुटुंबियांना दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा दुर्घटना घडल्यास त्यास कोण जबाबदार असेल? असा सवालही केला आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 116282

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *