राहाता पालिका मुख्याधिकारी व पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा! छावा संघटनेची निवेदनाद्वारे मागणी; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण

नायक वृत्तसेवा, राहाता
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणी मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवकांवर गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी राहाता नगरपरिषदेसमोर अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनेक दिवसांपासून राहाता येथे गोडावूनमध्ये आणून ठेवलेला आहे. त्या संदर्भात अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली 5 जुलै, 2021 रोजी नगरपरिषदेस घेराव आंदोलन करुन निवेदन दिले होते. परंतु संबंधित विषयी आजपर्यंत पालिकेने ताब्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या करणाने बंदिस्त ठेवला आहे? कोणत्या ठिकाणी बसविण्यासाठी आणण्यात आला असून त्याठिकाणी कोणते आरक्षण प्रस्तावित आहे? त्या संदर्भात पालिकेने कोणत्या विभागाची परवानगी घेतली आहे? तसेच आजपर्यंत कोणकोणते ठराव या पुतळ्याविषयी करण्यात आले ही सर्व माहिती लेखी स्वरूपात संघटनेला आठ दिवसांत देतो, असे मुख्याधिकार्‍यांनी अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांना संगितले होते.

मात्र, या आश्वासनास 10 दिवस होऊन देखील काहीही लेखी न देता केवळ वेळकाढूपणा करून विषय टाळण्याचा प्रयत्न चालवला असून शुक्रवारी (ता. 16) छावा संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी दिलेल्या लेखी पत्राप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पांढर्‍या कापडाने झाकलेला नाही किंवा कडेने सुरक्षित भिंत नाही हे त्यामुळे त्यांनीच दिलेल्या लेखी पत्रानुसार मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक यांच्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अवहेलना करून कर्तव्यात कसूर करत शिवाजी महाराजांचा पुतळा अनेक वर्षे गोडावूनमध्ये ठेवून, तो व्यवस्थित झाकून न ठेवणे, त्याची स्वच्छता न ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा इशारा संघटनेचे जिल्हाप्रमुख नितीन पटारे यांनी दिला आहे. याप्रसंगी सुहास निर्मळ, अतुल चौधरी, शरद बोंबले, ताराचंद राऊत, मनोज होंड, महेश लहारे, प्रथमेश राऊत, सुरेश ठोके, सुभाष कापसे आदी उपस्थित होते.

Visits: 87 Today: 3 Total: 1115241

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *