शिवजयंतीच्या परवानगीवरुन संगमनेरात राजकीय घमासान! शिवसेनेकडून पारंपरिक मिरवणुकीचा अर्ज; ठाकरे मंडळाचाही मिरवणुकीवर दावा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीथीनुसार साजर्‍या होणार्‍या 395 व्या जयंतीवरुन संगमनेरात राजकीय घमासान रंगल्याचे चित्र बघायला मिळत आहे. राज्यात 19 फेबु्रवारीला साजर्‍या होणार्‍या या उत्सवाकडे शासकीय म्हणून तर, तीथीनुसार शिवसेनेकडून साजर्‍या होणार्‍या उत्सवाला पारंपरिक म्हणून मानले जाते. त्यामुळे दरवर्षी राज्यासह संगमनेरातही दोनवेळा शिवजन्मोत्सव साजरा होतो. यावेळी मात्र शिवसेनेसह हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळानेही या उत्सवानिमित्त निघणार्‍या पारंपरिक मिरवणुकीवर दावा सांगितल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. सोबतच काँग्रेसने या वादात उडी घेत या उत्सवासाठी दोन दिवस बसस्थानकाचा परिसर मिळावा असा अर्ज यापूर्वीच दाखल केल्याने यंदाच्या शिवउत्सवाला वादाचे गालबोटं लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी बोलावलेल्या समन्वय बैठकीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या ‘राजकीय’ भूमिका समोर आल्यानंतर पोलिसांनी आजची बैठक गुंडाळून पुढील आठवड्यात निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

 
सुमारे अडीच दशकांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तीथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार यावरुन वादंग निर्माण झाला. तो पर्यंत मात्र देशभर तीथीनुसारच हा उत्सव साजरा केला जात होता. त्यावर उपाय म्हणून तत्कालीन सरकारने अभ्यासकांची समिती स्थापन करुन त्यांच्या अहवालावरुन राज्यात तारखेनुसार शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी राज्य सरकारच्या या निर्णयाला शिवसेनेसह हिंदुत्त्ववादी संघटनांनी विरोध करुन छत्रपती शिवाजी महाराज राज्याचे दैवत असल्याने दैवतांच्या जयंत्या तीथीनुसारच साजर्‍या होत असल्याचे सांगत तेव्हापासून स्वतंत्रपणे तीथीनुसार हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. संगमनेरातही दोनवेळा शिवजन्मोत्सव साजरा होतो.


शासकीय निर्णयानुसार 19 फेब्रुवारी रोजी साजर्‍या होणार्‍या या उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी पालिकेच्या आवारातून शिवप्रतिमेची शोभायात्राही काढली जाते. तर, तीथीनुसारच्या शिवजयंतीला शहरातील विविध मंडळे, संघटना व संस्था शिवप्रतिमांचे पूजन, पोवाडे, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवतात. सायंकाळी शिवसेनेच्या वतीने पालिकेच्या प्रवेशद्वारापासून वाजत-गाजत मिरवणूक निघते. त्यात शहरातील सर्व हिंदुत्त्ववादी संघटनांचा सहभाग असतो. त्यामुळे तीथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची शहरातील परंपरा खूप जूनी असली तरीही राज्यात दोनवेळा हा उत्सव साजरा होण्यास सुरुवात झाल्यापासून तीथीनुसार साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीला निघणारी सायंकालीन मिरवणूक स्थानिक शिवसेनेच्या वतीनेच काढली जाते.


यावेळी मात्र राज्यासह संगमनेरातील राजकीय स्थितीत मोठा बदल झाल्याने त्याचे पडसाद आता सार्वजनिक पातळीवरही दिसू लागले आहेत. त्यातूनच यंदाच्या तीथीनुसार साजर्‍या होणार्‍या शिवजयंती सोहळ्याच्या दिनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार अधिकृत मानल्या गेलेल्या शिवसेनेसह हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळानेही मिरवणुकीची परवानगी मागितली आहे. विशेष म्हणजे यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून परवानगीबाबत अद्याप कोणताही अर्ज आलेला नाही. पोलिसांच्या दप्तरी दाखल झालेल्या दोन्ही परवानगी अर्जांमध्ये मिरवणुकीची वेळ आणि मार्ग दोन्ही सारखेच असल्याने पोलिसांनी समन्वयासाठी दोन्ही बाजूच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी पाचरण केले होते.


यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, ठाकरे मंडळाचे अध्यक्ष अमर कतारी, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विश्‍वास मुर्तडक, माजी नगरसेवक किशोर टोकसे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रमेश काळे, नितीन अभंग, निखिल पापडेजा, उद्धव ठाकरे गटाचे पप्पू कानकाटे अशी बरीच मंडळी उपस्थित होती. यावेळी काँग्रेसने सर्वांनाच धक्का देत यावर्षी पहिल्यांदाच तीथीनुसार शिवजयंती साजरी करणार असल्याचे जाहीर केले. जयंतीच्या पूर्वसंध्येला बसस्थानकाच्या प्रवेशद्वारालगत शिवमंदिर उभारणार असल्याचे सांगत दुसर्‍या दिवशी 20 हजारांहून अधिकजण महाराष्ट्रात पहिल्यांदाच साकारणार्‍या शिवमंदिरात जावून छत्रपतींचे दर्शन घेतील असे सांगत कोणत्याही आडकाठी शिवाय परवानगी द्यावी अशी विनंती माजी नगराध्यक्ष मुर्तडक यांनी केली.


शिवसेनेचे शहरप्रमुख सूर्यवंशी यांनी शहरात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाल्यापासून शिवसेनेकडूनच तीथीनुसारच्या उत्सवाची मिरवणूक काढली जात असल्याकडे व शिवसेना अधिकृतपणे शिंदेगटाकडे असल्याचे सांगून उद्धव ठाकरे गटाकडून परवानगीचा अर्ज नसल्याकडे अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. ठाकरे मंडळाचे अध्यक्ष कतारी यांनी शिवसेना प्रणित हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील सर्व पक्ष, संघटना व नागरिकांना सोबत घेवून आम्ही हा उत्सव साजरा करीत आहोत. यावर्षीच्या उत्सवासाठी परवानगी मागितली आहे, निर्णयाची प्रतिक्षा असल्याचे सांगितले. या बैठकीतून कोणतेही फलीत समोर येत नसल्याने अखेर पोलिसांनी ‘तुमच्यात एकमत करा’ असा सल्ला देत पुढील आठवड्यात यावर निर्णय घेण्याचे सांगत आजची बैठक गुंडाळली.


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीथीनुसार साजर्‍या होणार्‍या जन्मोत्सवाबाबत आज विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या उपस्थितीत सर्वांशी चर्चा करण्यात आली. सायंकाळी निघणार्‍या मिरवणुकीवर एकापेक्षा अधिकजणांनी दावा केल्याने त्यातून तोडगा निघणे आवश्यक आहे. हा उत्सव आपल्या राजांचा आहे, त्यामुळे सर्वांनी समन्वयाने मार्ग काढून पुढील आठवड्यात पुन्हा चर्चा व निर्णय घेण्याचे ठरले आहे.
रवींद्र देशमुख
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर

Visits: 282 Today: 3 Total: 1102014

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *