पठारभागात एकाच रात्री तीन पाणबुडी मोटारींची चोरी पोलिसांनी तत्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकर्यांची मागणी
![]()
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी व तळपेवाडी परिसरातून चोरट्यांनी एकाच रात्री तीन शेतकर्यांच्या विहिरीमधून केबलसह पाणबुडी मोटारी चोरून नेल्या आहेत. आधीच कोविड संकटात पिचलेल्या शेतकर्यांना सतत धक्के बसत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, माळवाडी येथील बारकू ऊर्फ एकनाथ लक्ष्मण शेळके व सचिन दत्तात्रय बोडके या शेतकर्यांच्या विहिरीत दोन पाणबुडी मोटारी होत्या. गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी विहिरीतून पाणबुडी मोटारी वर काढून केबलसह चोरून पोबारा केला आहे. दुसर्या दिवशी सकाळी शेळके हे विहिरीवर गेले असता त्यांना पाईप कापलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे आपली पाणबुडी मोटार चोरून नेल्याची खात्री झाली. त्यानंतर त्याच रात्री तळपेवाडी शिवारातील गणेश कृष्णाजी शेळके यांच्याही विहिरीतून देखील अज्ञात चोरट्यांनी पाच एचपी क्षमतेची पाणबुडी मोटारीसह केबल चोरून नेली आहे.

याप्रकरणी बारकू शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 169/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करत आहे. दरम्यान यापूर्वी देखील बोटा परिसरातील शेतकर्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता पुन्हा एकाच रात्री तिघा शेतकर्यांच्या विहिरीतून तीन पाणबुडी मोटारी चोरी गेल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त करत चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून कोविड महामारी सुरू असल्याने शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यातच निसर्गाची अवकृपा आणि आता चोर्या वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे शेती करावी की नाही असा प्रश्न विचारत आहेत.
