पर्जन्य झंझावाताचा महिना सुरू होवूनही पाणलोटाला पावसाची प्रतीक्षा! जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांमध्ये शिल्लक आहे अवघा तेहतीस टक्के पाणीसाठा..

नायक वृत्तसेवा, अकोले
जिल्ह्यात मान्सूनचे वेळेवर आगमन होवूनही धरणांची पोटं खपाटीला जात आहेत. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत लाभक्षेत्रातील काही भागात समाधानकारक पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर वरुणराजाने दीर्घकाळापासून दडी मारल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. जुलैच्या महिन्यात पाणलोटात पावसाने अक्षरशः थैमान घातलेले असते, यावर्षी मात्र झंझावाताच्या महिन्यातील पहिला आठवडा उलटूनही चक्क पाणलोटालाच पावसाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. मुळा, भंडारदरा व निळवंडे या जिल्ह्यातील तीनही धरणांची एकूण पाणसाठवण क्षमता 45 हजार 359 द.ल.घ.फूट इतकी आहे, सद्यस्थितीत या धरणांमध्ये अवघा 33 टक्के म्हणजे 15 हजार 70 द.ल.घ.फूट इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. बुधवारी हरिश्चंद्रगड आणि रतनवाडी वगळता उर्वरीत संपूर्ण पाणलोटात दिवसभर चक्क सूर्यनारायणाने दर्शन दिले यावरुन पाणलोटाची स्थिती लक्षात येते.

कोकणातून देशाकडे येण्यासाठी ज्या पद्धतीने सह्याद्री रांग ओलांडावी लागते, तसाच नियम मान्सूनच्या नभांनाही लागू होतो. महासागरातून निर्माण झालेले ढग सात जूनच्या दरम्यान मोसमी वार्यासह राज्यात दाखल होतात आणि किनारपट्टीसह संपूर्ण घाटमाथ्यावर आच्छादन पांघरगतात. यावर्षीही मान्सूनच्या नभांनी जिल्ह्यातील पाणलोटासह लाभक्षेत्रातील काही तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मशागती करुन पावसाची प्रतीक्षा करणार्या बळीराजाला समाधान मिळाले, मात्र गेल्या मोठ्या कालावधीपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. त्यातच भंडारदरा धरणातून सध्या 820 क्यूसेक्सने पाणी सोडले जात असल्याने दिवसागणिक धरणातील पाणीसाठाही कमी होत आहे.

खरेतर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात जूनपासूनच पाऊस पडत असला तरीही जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने झंझावाताचे असतात. यापूर्वी अनेकवेळा जुलैच्या पंधरा दिवसांतच भंडारदरा तुडूंब होण्याचेही प्रसंग घडले आहेत. यावर्षी मात्र जून पाठोपाठ जुलैचा पहिला आठवडाही उलटला आहे. मात्र अद्यापही पाणलोट क्षेत्रातील सह्याद्रीचे कडे कोरडेठाकच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुळा व प्रवरा खोर्यातील बहुतेक सर्व ठिकाणी किरकोळ बुरबूर वगळता चक्क कडक ऊन्ह पडल्याचेही दृश्य दिसत आहे. गेल्या चोवीस तासांचा विचार करता भंडारदरा धरणात अवघ्या दोन द.ल.घ.फूट पाण्याची आवक झाली आहे, यावरुन पाणलोटातील पावसाची स्थिती लक्षात येते.

मागील चोवीस तासांचा विचार करता भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रतनवाडीत अवघा पाच मिलीमीटर पाऊस पडला असून गेल्या सव्वा महिन्यात एकूण 642 मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. खरेतर चालू हंगामातील आजवरच्या पावसाचा आकडा रतनवाडीसाठी अवघ्या चोवीस तासांचा आहे, यावरुन जिल्ह्यातील पावसाची स्थिती लक्षात येते. रतनवाडी वगळता घाटघर, साम्रद, पांजरे, उडदावणे, वाकी व कळसूबाईच्या शिखररांगावर लख्ख सूर्यप्रकाश असून पावसाचा कोठेही मागमूस नसल्याचे चित्र आहे. सध्या भंडारदर्यातून निळवंड्यात 840 क्युसेक्सने तर निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात 850 क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे. त्यातील 620 क्यूसेक्स पाणी ओझर नजीकच्या बंधार्यातून सोडण्यात आले आहे आहे. कोतुळनजीकच्या मुळापात्रातील प्रवाहही संकुचित झाला असून येथून अवघे 467 क्युसेक्स वेगाने पाणी वाहत असल्याने मुळा धरणातील आवक थांबली आहे. त्यामुळे बळीराजासह जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंता वाढल्या असून अवघ्या जिल्ह्याच्या नजरा आभाळावर खिळल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात मुळा, भंडारदरा व निळवंडे ही तीन मोठी धरणं आहेत. मुळा धरणाची साठवण क्षमता 26 हजार द.ल.घ.फुट, भंडारदरा धरणाची साठवण क्षमता 11 हजार 39 द.ल.घ.फूट तर निळवंडे धरणाची साठवण क्षमता 8 हजार 320 द.ल.घ.फूट आहे. या तिनही धरणात मिळून जिल्ह्याला 45 हजार 359 द.ल.घ.फूट पाणी उपलब्ध होते. यावर्षी मात्र जुलैचा पहिला आठवडा उलटूनही धरणातील पाणीसाठे वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे चिंतादायी चित्र दिसत आहे. आजच्या स्थितीत मुळा धरणात 9 हजार 233 द.ल.घ.फूट (35.51 टक्के) , भंडारदरा 4 हजार 843 द.ल.घ.फूट (43.47 टक्के) व निळवंडे धरणात अवघा 994 द.ल.घ.फूट (11.94 टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.


