जिल्ह्याची रुग्णसंख्या पुन्हा चारशेच्या खाली! संगमनेर शहरात अवघे तीन तर तालुक्यात एकूण बावीस बाधित..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यासह संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येला लागलेला उतार आजही कायम असून आज जिल्ह्यातून 354 तर संगमनेर तालुक्यातून अवघे 22 रुग्ण समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील संक्रमणात मोठी घट झाल्याचे चित्र दिसत असून अधुनमधून एखाद्या तालुक्यातून वाढणारी रुग्णसंख्या मात्र काळजाचा ठोका चुकवणारी ठरत आहे. आज पारनेर पाठोपाठ पाथर्डी व अकोले तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. तर संगमनेर शहरातील तिघांसह ग्रामीणभागातील 19 जणांना संक्रमण झाले आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 935 झाली आहे.

संगमनेर तालुक्यात मागील पाच दिवसांपासून रुग्णसंख्येचा वेग अत्यंत मंदावला असून दैनिक रुग्णसंख्या पंचवीसच्या आत आली आहे. त्यासोबतच मंगळवारी चारशेपार गेलेली जिल्ह्याची रुग्णसंख्याही पुन्हा चारशेच्या खाली आली आहे. विशेष म्हणजे आजच्या अहवालातून सर्वाधीक लोकसंख्या असलेल्या अहमदनगर महापालिका क्षेत्रातून अवघे चार रुग्ण समोर आले आहेत. तर पारनेर, पाथर्डी व अकोले तालुक्यातून आज वाढीव रुग्ण समोर आले आहेत. आजच्या अहवालाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या तीन तालुक्यांशिवाय उर्वरीत सर्व तालुक्यात आढळलेल्या रुग्णसंख्येचे आकडे 25 पेक्षा कमी आहेत. त्यामुळे आजचा अहवाल संपूर्ण जिल्ह्यासाठीच समाधानकारक ठरला आहे.

आज शासकीय प्रयोशाळेचा अवघा एक, खासगी प्रयोगशाळेचे 18 व रॅपिड चाचणीच्या निष्कर्षातून तीन अशा एकूण 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील जानकीनगर परिसरातील 25 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 20 वर्षीय तरुण व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील तेरा गावांमधून 19 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले असून त्यात खांडगाव येथील 34 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 21 वर्षीय तरुणी, जाखूरी येथील 30 वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथील 51 वर्षीय इसम, साकूर येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 37 व 33 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 31 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 40 वर्षीय तरुण, कर्हे येथील 26 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 50 वर्षीय इसमासह 36 व 25 वर्षीय तरुण, शेंडेवाडीतील 55 वर्षीय इसमासह 50 वर्षीय महिला, धांदरफळ बु. येथील 45 वर्षीय इसम, आश्वी बु. येथील 59 वर्षीय इसम व पोखरी बाळेश्वर येथील 26 वर्षीय महिलांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 935 झाली आहे.

मंगळवारी (ता.29) जिल्ह्याची रुग्णसंख्या वाढून चारशेपार गेल्याने पुन्हा काहीशा चिंता वाढल्या होत्या. मात्र आज त्यात मोठी घट होवून रुग्णसंख्या पुन्हा चारशेच्या खाली आली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेच्या 21, खासगी प्रयोगशाळेच्या 95 व रॅपिड अँटीजेनच्या निष्कर्षातील 238 अहवालातून जिल्ह्यात एकूण 354 रुग्ण आढळले आहेत. त्यात पारनेर 57, पाथर्डी 53, अकोले 45, जामखेड 23, संगमनेर 22, राहाता 21, कर्जत व श्रीगोंदा प्रत्येकी 20, नगर ग्रामीण 19, शेवगाव 18, श्रीरामपूर 15, इतर जिल्ह्यातील 11, राहुरी 10, नेवासा 9, कोपरगाव सात व अहमदनगर महापालिका क्षेत्रातील अवघ्या चार रुग्णांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 79 हजार 854 झाली आहे.


