… अखेर कोर्हाळेतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला! चोरीच्या उद्देशातून पती-पत्नीची हत्या; तिघा आरोपींना अटक
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील कोर्हाळे येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारांनीच पती-पत्नीची हत्या केल्याचे समोर आले असून तिघा आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. अद्याप दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी लोणी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी (ता.26) तालुक्यातील कोर्हाळे येथील चांगले वस्तीवरील शशीकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधूबाई शशीकांत चांगले (वय 55) या पती-पत्नीचा डोक्यात फावडे घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. सदरची हत्या ही भाऊबंधकीच्या वादातून झाली असावी असा पोलिसांचा संशय होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांच्या घरातील व्यक्तींसह नातेवाईकांची चौकशी केली. परंतु हत्याकांडाचा घटनाक्रम लक्षात घेता पोलिसांनी तपासाची चक्र वेगळ्या दिशेने फिरवून गुन्हेगारांना पकडण्यात अखेर यश आले.
या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी देवेंद्र दूधकाल्या उर्फ भारत भोसले (वय 28, रा.पढेगाव, ता.कोपरगाव), दिलीप विकास भोसले (वय 19, रा.जवळके, ता.कोपरगाव), आवेल विकास भोसले (वय 20, रा.जवळके, ता.कोपरगाव) या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर मायकल चव्हाण व डोंगर्या चव्हाण दोघेही (रा.लक्ष्मीनगर, कोपरगाव) यांचा कसून शोधन घेत आहे.
दरम्यान, देवेंद्र भोसले यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. परंतु कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने साथीदारांनी मिळून केला असल्याची कबुली दिली. तत्पूर्वी देवेंद्र भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारखी गुन्हे पारनेर, बेलवंडी व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या हत्याकांडातील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ. दीपाली काळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व पथक, राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये व पथकाने परिश्रम घेतले.