वृद्धाश्रमातील सदस्यांनी वृद्धेवर केले अंत्यसंस्कार
वृद्धाश्रमातील सदस्यांनी वृद्धेवर केले अंत्यसंस्कार
नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासाफाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमात राहत असलेल्या निराधार रंभाबाई गोपीनाथ शिरसाठ (पुंड) या आजीबाईचे वयाच्या 105 व्या वर्षी निधन झाले. ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे’ या उक्तीप्रमाणे परमेश्वरानेच सुबुद्धी दिल्याप्रमाणे रंभाबाईचे खरे कुटुंब असलेल्या व रक्ताचेही नाते नसलेल्या वृद्धाश्रमातील सदस्यांनी नातेवाईकांची भूमिका बजावून तर वृद्धाश्रमचे सदस्य सर्जेराव काळे यांनी मुलगा बनून रंभाबाईच्या चितेस अग्निडाग देऊन अंत्यसंस्कार केले.
नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथून महिला बचत गटाच्या काही सदस्यांनी अनाथ असलेल्या रंभाबाई शिरसाठ यांना पुढील तुकडा-पाण्याची सोय म्हणून वृद्धाश्रमामध्ये आणून घातले. वृद्धाश्रमात दाखल झाल्यापासून तिच्या नातेवाईकांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तिचे कोणीही नातेवाईक ती आमची आहे म्हणून पुढे यायला तयार होत नव्हते. त्यामध्ये वृद्धाश्रमातील चालक रावसाहेब मगर व सुरेखा मगर यांनीच तिला शेवटी मुलगा व मुलीचे प्रेम देऊन तिची शुश्रूषा केली. तसेच नेवासाफाटा येथील श्वास रुग्णालयाचे प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश काळे यांनीही रंभाबाईची शेवटच्या श्वासापर्यंत मोफत आरोग्य सेवा देऊन काळजी घेतली. मात्र सोमवारी (ता.17) मध्यरात्रीच्या सुमारास रंभाबाईची प्राणज्योत मालवली. अंत्यसंस्कार समयी वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर, सर्जेराव काळे, हंडीनिमगावचे सरपंच आण्णासाहेब जावळे, भिवाजीराव आघाव, पत्रकार सुधीर चव्हाण, संतोष मगर यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. ग्रामपंचायत सदस्य अशोक कांबळे, तान्हाजी जावळे तसेच शरणपूर वृध्दाश्रमातील संचालक मंडळ यांच्यासह सहकार्यांनी हिंदू धर्म शास्त्रोक्त पद्धतीने रंभाबाईवर अंत्यसंस्कार केले.