केलवडमध्ये महिलांचा पिण्याच्या पाण्यासाठी ‘हंडा मोर्चा’
केलवडमध्ये महिलांचा पिण्याच्या पाण्यासाठी ‘हंडा मोर्चा’
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील केलवड येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात आंदोलन करण्याची दुर्देवी वेळ आली आहे. यामुळे ग्रामपंचायत साध्या मुलभूत सुविधा पुरवू शकत नसल्याने कारभाराबाबत महिलांनी हंडा मोर्चा काढून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी गावाला मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली होती. परंतु ग्रामपंचायतीच्या सत्ताधार्यांनी काम न केल्यामुळे ही योजना रद्द झाली. यामुळे केलवड ग्रामपंचायतीचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी साधे नळही नाहीत. त्यामुळे सर्व नागरिकांना पाणी घेण्यासाठी शेतकर्यांच्या विहिरीवर जावे लागते. तसेच परंतु शेतात पाणी व पिके असल्याने विहिरीवर जाणे शक्य होत नाही. यामुळे संतापलेल्या महिलांनी नुकताच ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, कार्यालयात उपसरपंच, सत्ताधारी व ग्रामसेवक नसल्यामुळे मोर्चा मागे फिरला. गेल्या दीड महिन्यांपूर्वी देखील महिलांनी आंदोलन केले होते. तरी देखील पिण्याचे पाणी पुरवठ्याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नाही. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.