वेतन आयोग लागू करण्यासाठी राहुरी विद्यापीठ कर्मचार्‍यांचे आंदोलन

वेतन आयोग लागू करण्यासाठी राहुरी विद्यापीठ कर्मचार्‍यांचे आंदोलन
नायक वृत्तसेवा, राहुरी
राज्यातील कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचार्‍यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेसहीत सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सोमवारी (ता.2) राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सर्व कर्मचार्‍यांनी दहा जिल्ह्यांमध्ये तसेच विद्यापीठाच्या मुख्यालयासमोर सुमारे बाराशे कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

या आंदोलनाचे आयोजन विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ.उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ.महावीरसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या आंदोलनात सरचिटणीस मच्छिंद्र बाचकर, गणेश मेहेत्रे, महेश घाडगे, जनार्दन आव्हाड, मच्छिंद्र बेल्हेकर, संजय ठाणगे, सुरेखा निमसे यांसह विद्यापीठातील सर्व कर्मचारी, प्राध्यापक, महिला कर्मचार्‍यांची मोठी उपस्थिती होती. पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणापासून सुरु झालेला हे आंदोलन विद्यापीठातील महात्मा फुले पुतळ्यामार्गे जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासकीय इमारतीजवळ थांबविण्यात आले. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाच्या पदाधिकार्‍यांनी प्रशासन विभागातील सुहास हराळे यांच्याकडे निवेदन देवून शासनाच्या दुर्लक्षाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

विद्यापीठातील दहाही जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 27 ऑक्टोबरपासून सर्व कार्यक्षेत्रातील कर्मचारी काळ्या फिती लावून काम करत आहे. आज या आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये 2 नोव्हेंबरपासून 5 नोव्हेंबरपर्यंत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. 6 नोव्हेंबर रोजी एक दिवसाची सामूहिक रजा घेवून 7 नोव्हेंबरपासून सर्व अधिकारी व कर्मचारी बेमुदत लेखणीबंद आंदोलन करणार आहेत.

 

Visits: 11 Today: 1 Total: 114829

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *