माळवाडीमध्ये कारच्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारात असलेल्या माळवाडी येथे कारच्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी झाला असून कारमधील दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (ता.6) सकाळी घडला आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माळवाडी शिवारातील कुर्‍हाडे वस्ती येथील वैष्णव संदीप कुर्‍हाडे हा तरूण बुधवारी सकाळी दूध घालण्यासाठी सायकलवरून डेअरीवर येत होता. त्याच दरम्यान वैष्णव हा महामार्ग ओलांडत असताना पुण्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या कारने सायकलला जोराची धडक दिली. या अपघातात वैष्णवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर कारमधील दोघे किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचारार्थ आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, वैष्णवला अधिक उपचारांसाठी पुणे येथे नेण्यात आले आहे. अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान माळवाडी येथे वर्तुळ असल्याने दोन्ही बाजूच्या नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. त्याच दोन्ही बाजूंनी छोटी-मोठी वाहनेही भरधाव वेगाने जात असल्याने सततचे अपघात टाळण्यासाठी गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Visits: 125 Today: 1 Total: 1867197

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *