मे महिन्याने तोडले तालुक्यातील आजवरच्या रुग्णसंख्येचे सर्व उच्चांक! संगमनेर तालुक्यातील रुग्ण समोर येण्याची सरासरी गतीही वीस टक्क्याहून अधिक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील वर्षी आठ रुग्णांसह तालुक्यात पाय ठेवणार्या कोविडने वर्षभरात तालुक्यातील सर्व बाजूंना पाय पसरल्यानंतर चालू वर्षातील एप्रिलमध्ये 6 हजार 445 रुग्णांसह नवा उच्चांक गाठला होता. रुग्णसंख्येच्या या शिखरावरुन कोविडचा परतीचा प्रवास सुरु होईल असे वाटत असतांना सरत्या मे महिन्याने एप्रिललाही मागे टाकून 6 हजार 566 इतकी उच्चांकी रुग्णसंख्या गाठली आहे. जूनच्या पहिल्या दिवशीही वाढत्या रुग्णसंख्याचा आकडा समोर आला असून जिल्हा दुसर्या संक्रमणापासून मुक्त होत असतांना तालुक्याची स्थिती मात्र अद्यापही चिंताजनक असल्याचेच दिसत आहे. त्यातच जिल्ह्याचा रुग्ण समोर येण्याचा सरासरी वेग 8.40 टक्के असला तरीही संगमनेर तालुक्याचा दर मात्र अजूनही 20.50 टक्के आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील 1 लाख 6 हजार 441 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यातून 21 हजार 822 रुग्ण समोर आले आहेत.

मागील वर्षी एप्रिलमध्ये शहरातील सात जणांसह तालुक्यातील एकाला कोविडचे संक्रमण होवून संगमनेर तालुक्यात कोविड विषाणूंचा प्रवेश झाला. त्यावेळी देशात कडकडीत लॉकडाऊन असल्याने कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला नाही. त्यामुळे प्रतिबंध लागू असलेल्या मे मध्ये 36 तर जून मध्ये अवघे 65 रुग्ण समोर आले होते. मात्र त्यानंतरच्या काळात शासकीय कार्यालयांसह आपत्ती व्यवस्थापनाचा भाग असलेल्या अधिकार्यांना त्यांचे दैनंदिन कामकाज सुरु करण्याचे आदेश मिळाल्याने कोविडकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होण्यास सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम जुलैमध्ये सरत्या महिन्याच्या दहापटीने रुग्ण वाढ होवून तब्बल 650 रुग्ण आढळले. ऑगस्टमध्ये त्यात आणखी वाढ झाली आणि एकाच महिन्यात तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत आणखी 961 रुग्णांची भर पडली.

ऑगस्टमध्ये विविध सण-उत्सवांची भरमार असल्याने व त्यातच महिन्याच्या शेवटी गणेशोत्सवालाही प्रारंभ झाल्याने नागरिकांनी कोविड नियमांकडे दुर्लक्ष करीत मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये गर्दी केली. त्यामुळे प्रादुर्भाव भरीस पडला आणि सप्टेंबरमध्ये तालुक्याच्या कोविड रुग्णसंख्येचा उच्चांक होवून एकाच महिन्यात तब्बल 1 हजार 529 रुग्ण समोर आले. त्यावरुन दिवाळीनंतर देशात कोविडचे संक्रमण सुरु होईल असे अंदाज अनेक वैद्यकीय तज्ज्ञांसह माध्यमांमधूनही वर्तविण्यात आल्याने नागरिकांसह प्रशासनही सावध झाले. मात्र प्रत्यक्षात उलटेच घडले आणि सप्टेंबरच्या तुलनेत नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मो या प्रमाणात गर्दी करुनही संक्रमणात घट होवून ऑक्टोबरमध्ये 1 हजार 41 तर नोव्हेंबरमध्ये 908 रुग्ण समोर आले. वर्षातील शेवटचा महिनाही कोविड संक्रमणात घट आणणारा ठरला आणि या महिन्यात अवघे 817 रुग्ण समोर आले.

याच दरम्यान पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट व हैद्राबादच्या भारत बायोटेक या कंपन्यांनी जानेवारीत प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात करता येईल अशी घोषणा केल्याने देशभरात चैतन्य निर्माण झाले. त्यातच नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात रुग्णसंख्येला आश्चर्यकारक ओहोटी लागून महिन्याभरात अवघे 301 रुग्ण समोर आल्याने देशासह राज्यातही कोविडने माघार घेतल्याचे चित्र निर्माण झाले. याच महिन्यात राज्य सरकारने पंचायत समित्यांच्या निवडणूकांचा बारही उडवला. त्याचा परिणाम प्रशासनासह नागरिकांच्या मानसिकतेवर होवून सर्वांनाच कोविडचा विसर पडला आणि एकप्रकारे नियमांमध्ये आपोआप शिथीलता निर्माण झाली. या स्थितीचा फायदा घेवून काही धनदांडग्यांनी आणि काही राजकीय धुरिणांनी आपल्या आपत्यांचे विवाह सोहळे हजारोंच्या उपस्थितीत साजरे केले. त्यामुळे फेब्रुवारीत रुग्णसंख्या वाढून ती 495 वर पोहोचली.
![]()
फेब्रुवारीतच धोक्याची सूचना मिळूनही ना शासन जागले, ना प्रशासन आणि ना सामान्य नागरिक. त्यामुळे कोविडला पाय पसरण्यास खुले मैदानच मिळाल्याने मार्चमध्येच मागील वर्षभरातील कोविड रुग्णसंख्येचे सर्व उच्चांक मोडीत निघून 1 हजार 919 रुग्ण समोर आले. त्यामुळे पुन्हा नियमांची सक्ति सुरु झाली. दुकानांच्या वेळा बदलल्या, काही दुकानांना टाळे लागले आणि राज्य पुन्हा निर्बंधांच्या दारात जावून स्वतः उभे राहीले. तरीही अनेकांनी मंगलकार्यालयात होत नाही म्हणून घरासमोरच मांडव घालून धुमधडाक्यात लग्न उरकण्याचा जणू सपाटाच लावला होता. त्यातून ग्रामीणभागातील संक्रमणाची गती अधिक वाढून एप्रिलमध्ये सरासरी 215 रुग्ण दररोज या गतीने तब्बल 6 हजार 445 रुग्णांची वाढ होवून राज्यावर दुसर्या संक्रमणाची लाट कोसळल्याचे जाहीर झाले.

पहिल्या संक्रमणातून वाचलेल्यांना दुसरे संक्रमणही समानच वाटल्याने त्यांच्याकडून नियमांकडे दुर्लक्ष होवू लागले. त्याचवेळी आरोग्य यंत्रणांकडून कोविडची दुसरी लाट पूर्वीच्या लाटेपेक्षा अधिक गतीमान आणि जीवघेणी असल्याचे वारंवार आवाहन करुनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करुन लागल्याने नियमांची सक्ति वाढली आणि रुग्णांची संख्याही वाढतच राहीली. गेल्या मे महिन्यात तर कोविड संक्रमणात संगमनेर तालुका अहमदनगर महापालिका क्षेत्राच्या खालोखाल राहीला. मागील संगमनेरच्या कोविड वॉररुमच्या आकडेवारीनुसार सरासरी 212 रुग्ण या गतीने 6 हजार 566 रुग्ण, तर स्थानि व जिल्हा प्रशासनाने दररोज जाहीर केलेल्या अहवालांच्या बेरजेतून सरासरी 279 रुग्ण दररोज या गतीने तब्बल 8 हजार 655 रुग्ण आढळले. नागरिकांच्या हलगर्जीपणा आणि प्रशासनाचा वेळ काढू पणा यामुळे मागील तीन महिन्यात संक्रमणाच्या आकड्यांनी अक्षरशः कहर केला, त्यात मे महिना तर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणांची परिक्षा घेणाराच ठरला. गेल्या काही दिवसांपासून संक्रमणात एकसारखी घट होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे, मात्र मागील वेळी ज्या चुका घडल्या त्यांचीच पुन्हा पुनरावृत्ती झाल्यास त्याचे गंभीर परिणाम आपल्या सर्वांनाच भोगावे लागतील हे मात्र खरे.

