नगर जिल्ह्याला नव्या अनलॉकची कोणतीही सवलत मिळणार नाही! जिल्ह्याच्या पॉझिटिव्ह दरासह ऑक्सीजन बेडवरील रुग्णांची संख्या चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक असल्याने जिल्ह्यात कठोर निर्बंध कायम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये उद्यापासून मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याची गती आणि जिल्ह्यात चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण ऑक्सीजन खाटांवर असल्यामुळे जिल्ह्याला उद्यापासूनच्या अनलॉक मधून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आसपासचे जिल्हे सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुले असले तरीही अहमदनगर जिल्ह्यातील अत्यावश्यक व्यवहार मात्र पूर्वीप्रमाणेच सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहतील या वृत्ताला संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दुजोरा दिला आहे.
राज्य शासनाने उद्यापासून 15 जून पर्यंत पंधरा दिवसांपर्यंत लोकडाऊन वाढवला आहे. तसेच राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह दर दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे, तसेच तेथील ऑक्सीजन खाटा चाळीस टक्‍क्‍यांहून कमी भरलेल्या आहेत अशा जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून अत्यावश्यकसह अन्य व्यवसायांना सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक जिल्हे उद्यापासून खुले राहणार आहेत, मात्र त्याचवेळी अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत अहमदनगर जिल्ह्यात सकाळी 7 ते 11 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे. त्यासोबतच वैद्यकीय आस्थापना व औषधांची दुकानेही सुरु ठेवण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारच्या घोषणेनुसार मंगळवारपासून बदल होईल असे जिल्हावासीयांना अपेक्षित होते, मात्र आजच्या तारखेला जिल्ह्यात 10 हजार 884 सक्रिय रुग्ण असून चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक ऑक्सिजनच्या खाटा व्यापलेल्या आहेत. तसेच जिल्ह्यात रुग्ण समोर येण्याची सरासरी गतीही दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या नवीन अनलॉक नियमांचा अहमदनगर जिल्ह्याला कोणताही फायदा होणार नसून पुढील पंधरा दिवस आहे त्याच नियमांचे सर्वांना पालन करावे लागणार आहे. या वृत्ताला संगमनेरचे इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दुजोरा दिला आहे.
Visits: 211 Today: 2 Total: 404186

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *