दोन महिन्यानंतर जिल्ह्याची रुग्णसंख्या हजाराच्या आंत! जिल्ह्यात आज फक्त संगमनेर तालुक्यात तीन आकडी रुग्ण आढळले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या अकरा दिवसांपासून जिल्ह्याला मिळत असलेला दिलासा आज समाधानात परावर्तीत झाला असून तब्बल 65 दिवसांनंतर जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आज हजाराच्या आंत आली आहे. आजच्या अहवालांमधून जिल्ह्यात अवघे 912 रुग्ण आढळले आहेत. रविवारी दुहेरी रुग्णसंख्येत आलेल्या संगमनेर तालुक्यात आज मात्र रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली असून जिल्ह्यातील चौदा तालुक्यात केवळ संगमनेरात तीन आकडी रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 21 हजार 795 झाली आहे.


अहमदनगर जिल्ह्याच्या कोविड संक्रमणात गेल्या अकरा दिवसांपासून टप्प्याटप्प्याने घट होवून आजतर जिल्हा मोठ्या कालावधीनंतर एक हजार रुग्णसंख्येच्या आत आला आहे. यापूर्वी 27 मार्च रोजी जिल्ह्यात 641 रुग्ण आढळले होते. मात्र त्यानंतर कोविड संक्रमणाच्या गतीने प्रचंड वेग घेतल्याने गेल्या दोन महिन्यात जिल्ह्याची कोविड स्थिती चिंताजनक अवस्थेत पोहोचून जिल्हा ‘रेडझोन’मध्ये गणला गेला होता. मात्र मागील सलग अकरा दिवसांपासून त्यात घट होत असून आजतर 65 दिवसांतील सर्वाधीक निचांकी रुग्ण समोर आल्याने जिल्ह्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


आज संगमनेर वगळता जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील रुग्णगतीला मोठा ब्रेक लागल्याचे समाधानकारक दृष्य समोर आले आहे. जिल्ह्यातील चौदा तालुक्यांच्या तुलनात्मक स्थितीत संगमनेरात 137 तर दुसर्‍या क्रमांच्या नेवासा तालुक्यातून 81 रुग्ण आढळले. एप्रिलमध्ये संगमनेर तालुक्यात सरासरी 215 या गतीने 6 हजार 445 रुग्णांची वाढ झाली होती. मे मध्ये मात्र संक्रमणाने आजवरचे सर्व उच्चांक मागे टाकीत जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकाच्या स्थानावर उसळी घेतली. गेल्या 31 दिवसांत तालुक्यात सरासरी 275 रुग्ण रोज या गतीने 8 हजार 518 रुग्णांची वाढ झाली. अर्थात यातील अनेक रुग्ण अन्य तालुके व जिल्ह्यातील असल्याने त्यांची नावे कमी झाल्यानंतर तालुक्यातील बाधितांचा खरा आकडा समोर येईल.


आज शासकीय प्रयोगशाळेकडून मिळालेल्या अहवालांचा तपशिल प्राप्त झाला नाही. मात्र या अहवालातून तालुक्यातील 74 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर खासगी प्रयोगशाळेच्या 34 आणि रॅपीड चाचणीच्या 29 अहवालातून अशा 63 जणांमध्ये शहरातील तेरा, अन्य तालुक्यातील दोन व ग्रामीण भागातील 48 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले, त्यात शहरातील जनता नगरमधील 21 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 43 व 36 वर्षीय महिलांसह 13 वर्षीय मुलगा व 10 वर्षीय मुलगी आणि केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 53 वर्षीय इसम, 58, 46 व 34 वर्षीय महिला आणि 17 वर्षीय तरुणीसह 14 व 10 वर्षीय मुलींना कोविडची लागण झाली आहे.


त्यासोबतच तालुक्याच्या ग्रामीणभागातील कोकणगाव येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसम, निमगाव जाळीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घुलेवाडीतील 82 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 28 वर्षीय तरुण व 17 वर्षीय तरुणी, जाखुरी येथील 65 वर्षीय महिलेसह 57 वर्षीय इसम, वडगाव पान येथील 36 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 35 वर्षीय महिलेसह 16 वर्षीय मुलगा, पेमगिरी येथील 85 वर्षीय महिला, आश्‍वी खुर्दमधील 80 वर्षीय वयोवृद्धासह 32 वर्षीय दोघे व 21 वर्षीय तरुण आणि 10 वर्षीय मुलगा, मालुंजे येथील 50 व 45 वर्षीय महिला, शेडगाव येथील 32 वर्षीय महिला, पिंप्रीतील 25 व 26 वर्षीय तरुण, दाढ खुर्द येथील 12 वर्षीय मुलगी, सुकेवाडीतील 54 व 30 वर्षीय दोघी महिला,


कोल्हेवाडीतील 14 वर्षीय मुलगी, सादतपूर येथील 38 वर्षीय तरुण, मालदाड येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 33 वर्षीय तरुण, कोळवाड्यातील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 64 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 42 व 25 वर्षीय तरुण, राजापूर येथील 82 वर्षीय वयोवृद्ध इसम, धांदरफळ बु. येथील 65 वर्षीय महिलेसह 49 वर्षीय इसम, वाघापूर येथील 45 वर्षीय महिला, साकूर येथील 45 वर्षीय इसम, वेल्हाळे येथील 50 वर्षीय महिला, खळीतील 89 वर्षीय वयोवृद्ध इसम, कनोलीतील 28 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील 52 वर्षीय महिला, अंभोरे येथील 55 वर्षीय महिला, कर्‍हे येथील 87 वर्षीय महिला, समनापूरातील 36 वर्षीय तरुण, देवगावातील 57 वर्षीय इसम, पळसखेडे येथील 65 वर्षीय ज्येश्ठ नागरिक व चणेगाव येथील 58 वर्षीय इसम. तसेच अन्य तालुक्यातील धुमाळवाडी येथील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व म्हैसगाव येथील 55 वर्षीय महिला अशा एकूण 137 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत.


आजच्या अहवालांमधून जिल्ह्याला खुप मोठा दिलासा मिळाला. गेल्या तब्बल 65 दिवसांनंतर जिल्ह्याची रुग्णसंख्या खालावत आज हजारांच्या आंत आली. आज शासकीय प्रयोगशाळेचे 223, खासगी प्रयोगशाळेचे 359 आणि रॅपीड अँटीजेनचे 330 अशा एकूण 912 अहवालातून संगमनेर तालुक्यात सर्वाधीक 137, नेवासा 81, शेवगाव 78, श्रीरामपूर 70, नगर ग्रामीण 63, पारनेर 59, अकोले 57, श्रीगोंदा 55, जामखेड 49, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 45, राहाता 40, पाथर्डी 38, इतर राज्यातील 32, कर्जत व कोपरगाव प्रत्येकी 26, इतर जिल्ह्यातील बारा व भिंगार लष्करी परिसरातील दोघांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 62 हजार 135 झाली आहे. एकीकडे रुग्णसंख्या आटत असल्याचा दिलासा मिळत असतांना दुसरीकडे जिल्ह्यात कोविड बाधितांच्या मृत्यूची संख्या मात्र चिंताजनक आहे. आजही जिल्ह्यातील 45 नागरिकांचा कोविडचा संसर्ग होवून मृत्यू झाल्याचे समोर आले, त्यामुळे जिल्ह्यातील कोविड बळींची संख्या आता 3 हजार 218 झाली आहे. 

Visits: 102 Today: 1 Total: 1107718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *