कुमशेत येथील निराधार भावंडांना मिळाला ‘आधार’!
![]()
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कुमशेत येथील आदिवासी भावंडांचे पत्रे तौक्ते चक्रीवादळाने उडाली. यामुळे निराधार असलेल्या चार भावंडांना गावाने समाज मंदिरात आसरा दिला होता. मात्र, घराचे छत्रच हरविल्याने ही भावंडे बेघर झाली होती. ही हकीकत आधार समन्वयकांना समजताच ‘आधार’ फाऊंडेशनने दानशूरांना मदतीचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद मिळून आधारच्या शिलेदारांनीही अधिक भर घालून 48 सिमेंट पत्रे, वाहतूक खर्च आदिंसह 20 हजारांची नुकतीच मदत केली आहे. याबद्दल फाऊंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सरपंच सयाजी अस्वले यांनी निराधार भावंडे लालू व भाऊ अस्वले यांना सोबत घेऊन आले. राजूर येथेच एका दुकानातून दर्जेदार एव्हरेस्ट कंपनीचे 48 पत्रे, इतर साहित्य खरेदी केले. सोबत पत्रे पोहोच करण्यासाठी 1 हजार रुपये गाडी भाड्यासह 20 हजार रुपये खर्च केले. पत्रे ताब्यात मिळताच अस्वले भावंडांचा आनंद द्विगुणित झाला. दरम्यान, सरकारी पंचनामा झाला, पण त्यात मिळणारी तोकडी मदत कधी मिळेल हे सांगता येत नव्हते. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने अत्यंत तातडीने आधारने आवाहन करत मदत गोळा केली. काही रक्कम संस्थेने स्वतः खर्च करत 20 हजारांचा खर्च अस्वले भावंडांसाठी करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच आई-वडिलांचे छत्र हरपले असल्याने शिक्षण अर्ध्यावरच राहिले आहे. याची दखल घेत आधारच्या माध्यमातून किमान 2 मुलांना समुपदेशन करत शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेंतर्गत त्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे. तसेच पत्रकार शांताराम काळे यांनीही या भावंडांना शिक्षणासाठी मदत करण्याचे सांगितले आहे. सदर मदतीसाठी सरपंच सयाजी अस्वले, पत्रकार शांताराम काळे यांनी मोलाची मदत करत पाठपुरावा केला. त्यास आधार समन्वयक डॉ.महादेव अरगडे, सुखदेव इल्हे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत उबाळे, आनंदा साबळे यांनी अग्रक्रमाने पुढाकार घेत मदत पोहोच केली. याबद्दल दानशूर आणि आधारचे सर्वत्र कौतुक होत आहे.
