बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरुण जखमी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारात मकाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक दोघा तरुणांवर हल्ला करत जखमी केल्याची घटना गुरुवारी (ता.15) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नान्नज दुमाला शिवारातील चत्तर व पाटोळे वस्ती येथे काही नागरिकांना बिबट्या दिसला. त्यामुळे बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी उपसरपंच सोमनाथ चत्तर यांच्यासह ग्रामस्थ गेले होते. त्याचवेळी मकाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने ऋषीकेश रावसाहेब पाटोळे (वय 22) व ओंकार विलास पाटोळे (वय 17) या दोघा तरुणांवर हल्ला केला. यामध्ये तोंडाला, हाताला व खांद्याला पंजा मारल्याने जखमा झाल्या आहेत. यानंतर जखमींना तळेगाव दिघे येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी केली आहे.