सलग दुसर्‍या श्रावणात भक्तगण महादेवापासून दूरच! हजारों भाविकांची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे ‘कुलुपबंदच’ राहणार..


श्याम तिवारी, संगमनेर
गताहारी अर्थात आपल्या दैनंदिन आहारात बदल करण्याचा दिवस. यानंतर प्रारंभ होणार्‍या श्रावणमासात भक्तिरसाचा महापूर ओसंडत असतो. हिंदू धर्मियातील ईश्वरावर श्रद्धा असलेला प्रत्येक नागरिक या महिन्यात महादेवाच्या उपासणेत अक्षरशः तल्लीन झालेला असतो. अगदी वर्षभर दारुच्या नशेत तर्रऽ असणारेही या महिन्यात दारुचा मोह टाळतात इतकं या मासाचं माहात्म्य आहे. संगमनेर तालुक्यातील खांडेश्वर, बाळेश्वर व निझर्णेश्वर यासह अनेक छोट्या-मोठ्या शिवालयांमध्ये श्रावणात अगदी मध्यरात्रीपासूनच भाविकांची रिघ लागते. आषाढपाळ्यांनंतर हिरव्यागार सौंदर्याने नटलेल्या धरणीवरील निसर्गसंपन्न परिसरात वसलेल्या या शिवालयांकडे जाणारे मार्ग मात्र कोविडने सलग दुसर्‍या वर्षी रोखले आहेत. राज्यात कोविडचा प्रादुर्भाव अजूनही टिकून असल्याने राज्य शासनाकडून मंदिरांना लागलेले टाळे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे भक्तिरसात चिंब भिजवणार्‍या श्रावणातही आपल्या हजारों भक्तगणांपासून महादेव दूरच राहणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना आपल्या घरातच शिवआराधना करावी लागणार आहे.


भक्तिला मर्यादा नसतात असं म्हटलं जातं. हिंदू धर्मात विविध अवतारातील तेहतीस कोटी देवता असल्याचे ईश्वर श्रद्धा असलेली मंडळी मानते. त्यातून विविध अवतारांवर भक्ति असलेल्या भाविकांची विभागणी होते. यासर्व देवांमध्ये एकमेव महादेव असे देव आहेत ज्यांना ईश्वर मानणारा प्रत्येकजण आपले आराध्य मानूनच पूजतो. आषाढ महिन्यातील वारीनंतर गताहारी अमावस्येपर्यंत राज्यात मांसाहार करण्याचा हंगाम असतो. या कालावधीत अनेकजण आपल्या स्नेहीजनांना एकत्र बोलावून मटण-भाकरीच्या पंगतीही उठवतात. एकादशीनंतरचा काळ आठवड्यातील ठराविक वाराला मटणाच्या दुकानांसमोर रांगाही दिसतात. याचा शेवट गताहारी अमावस्येला, अर्थातच आपल्या आहारात बदल करण्याच्या शेवटच्या दिवशी होतो. मांसाहार करणार्‍या राज्यातील बहुतेक घरांमध्ये आज मांसाहाराची मेजवाणी हमखास असणार.


आश्चर्य म्हणजे लागलीच दुसर्‍या दिवशी श्रावण मासाला सुरुवात होते आणि ईश्वरावर श्रद्धा असलेले बहुतेक हिंदू धर्मीय आपल्या आहारात बदल करुन महिनाभर, अनेकजण तर थेट दसर्‍यापर्यंत मांसाहार टाळतात. श्रावणातील वातावरण अतिशय अल्हाददायक असते. दोन महिन्याच्या पावसानंतर धरणीचे रुपडे पालटलेले असते. डोंगरदर्‍या गच्च हिरव्या झालेल्या असतात. अशाच निसर्गरम्य परिसरातच प्राचीन महत्त्व असलेली शिवालये हमखास असतात. संगमनेर तालुक्यातही खांडगाव, बाळेश्वर व निझर्णेश्वर ही तीन शिवालये मोठा इतिहास असलेली आहेत. पठारावरील बाळेश्वराचा अवतार बालशिव असल्याचे भाविक मानतात. त्यामुळे या शिवालयात श्रावणात महिनाभर गर्दी असते. सोमवारी पहाटेपासूनच येथे फठारासह दुरदूरच्या भाविकांची मोठी गर्दी होते. पावसानंतरचा बाळेश्वराच्या टेकडीवरील निसर्ग म्हणजे महाबळेश्वराचीच अनुभूती देणारा. त्यामुळे श्रावणाच्या महिनाभरात शिवभक्त असलेला तालुक्यातील प्रत्येक नागरिक एकदातरी येथे जावून येतोच.


संगमनेरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खांडगाव येथील खांडेश्वरावर तर संपूर्ण तालुक्याची श्रद्धा. श्रावणाच्या महिन्यात पहाटे शहराकडून खांडगावकडे जाणारे सर्व रस्ते भजने गात, धुन वाजवत जाणार्‍या भाविकांच्या जथ्यांनी फुललेले असतात. दर सोमवारी खांडेश्वर मंदिरासमोर मोठी यात्राही भरते. खांडेश्वराची महिमा केवळ संगमनेरच नव्हेतर आसपासच्या तालुक्यांसह जिल्ह्यातही पसरलेली असल्याने श्रावणी सोमवारी येथे शिवभक्तांची मोठी मांदियाळी असते. अशाच प्रकारची स्थिती तालुक्याच्या पूर्वेकडील निझर्णेश्वरची आहे. ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या या शिवालयावर लोणी, राहाता, श्रीरामपूर, नगर येथील भाविकांचीही मोठी श्रद्धा असल्याने दर श्रावणी सोमवारी येथील मंदिरात दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात.


या प्रमुख शिवालयांसह निमगाव जाळीजवळील दुधेश्वर, पिंपळगाव कोंझिर्‍या जवळील कणकेश्वर अशी अनेक शिवालये आहेत, जेथे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. सतत ध्यानमग्न प्रतिमा असलेले महादेव शांत आणि प्रसन्न ठिकाणीच ध्यानस्थ होतात असं पुराणातून सांगीतलं जातं. देशभरातील सर्व प्राचीन शिवालये त्या अनुषंगाचीच असल्याचे लक्षात येते. संगमनेर तालुक्यातील वरील सर्व शिवालयेही निसर्गसंपन्न असलेल्या सह्याद्रीच्या परिसरातील आहेत. बाळेश्वर मंदिराचा परिसर तर निसर्ग सौंदर्याचा अविष्कारच आहे. वन विभागाने येथील परिसराचा विकास करण्यासह मोठ्या प्रमाणात वनीकरण केल्याने हा परिसर भाविकांसह पर्यटकांनाही नेहमी खुणावतो.


खांडेश्वराचा परिसरही असाच सुंदर आहे. खांडेश्वर मंदिरातील शिवलिंगाचे प्रतिरुप असलेल्या व डोंगर्‍याच्या पोटातील गुहेत कातळातच कोरलेले कपारेश्वराचे शिवलिंग हे येथील वैशिष्ट्य. खांडेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूने पायी अथवा खांडगावमधून वाहनाने थेट मंदिरापर्यंत जाता येते. कपारेश्वर डोंगराच्या माथ्यावर एकाबाजूला वनविभागाने जंगल फुलवले आहे, तर दुसर्‍या बाजूला काही पर्यावरण प्रेमी नागरिकांनी बाटल्यातून पाणी वाहून शंभरावर झाडे जगवून ती मोठी केली आहेत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि मालपाणी उद्योग समूहाने या परिसरात एक लाख झाडे लावून ती जगवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. येत्या काही वर्षात त्याचे परिणाम निश्चितच बघायला मिळतील. त्यामुळे श्रावणात येथेही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अनेकजण कौंटुंबिक सहलीसाठीही या ठिकाणांवर येतात आणि दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात राहतात. 

निझर्णेश्वराचे मंदिर तर चोहोबाजूने डोंगराने वेढलेले आहे. श्रावणाआधी झालेल्या पावसाने या डोंगरांवर हिरवेगार शालू अंथरलेले दिसतात. पाऊस असेल तर काही ठिकाणी जलप्रपातही दिसतात. वनविभागाने या भागातही मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करुन निझर्णेश्वराच्या पवित्र स्थळाचे वातावरण अधिक अल्हाददायक करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकजण आपल्या मुलांची डोंगर चढण्याची हौस भागवण्यासाठी श्रवणातील दर्शनाचे निमित्त साधून येथे सहलीसाठीही येतात आणि निसर्गाचा आनंदही घेतात. या कालावणीत मोठ्या यात्रा भरुन ग्रामीण अर्थकारणालाही गती मिळते. कोविडने मात्र याही वर्षी त्यात खोडा घातला आहे. राज्यातील प्रादुर्भाव अजूनही आटोक्यात नसल्याने राज्यातील धार्मिकस्थळांचे टाळे उघडलेले नाही. श्रावणातही ही स्थिती जैसे थे राहणार असल्याने भक्तिरसाचा महिना असूनही भाविकांना महादेवापासून दूरच रहावे लागणार आहे. याबाबत श्री क्षेत्र बाळेश्वर, श्री क्षेत्र खांडेश्वर व श्री क्षेत्र निझर्णेश्वर देवस्थान व्यवस्थापन समितीने भाविकांनी दर्शनासाठी येवू नये असे आवाहन केले आहे.

Visits: 57 Today: 1 Total: 430238

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *