आचारसंहितेच्या आडून मुळा नदीवर वाळू तस्करांचा दरोडा! दिवसाढवळ्या सुरु आहे लुट; ट्रॅक्टरच्या आवाजाने ग्रामस्थांच्या झोपा उडाल्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील नद्यांच्या पात्रावर करडी नजर असलेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशांना आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाल्याने तालुक्यातील वाळू तस्कर बेफाम झाले आहेत. मुख्यालयापासून चाळीस किलोमीटर दूर असलेल्या आणि पठारावरील असंख्य वाळू तस्करांसाठी लुटीचे नंदनवन बनलेल्या मुळा नदीच्या पात्रावर तर अक्षरशः दरोडा पडला आहे. दिवसाढवळ्या मजुरांकरवी पात्रातच वाळूचे मोठे साठे करुन रात्री ट्रॅक्टरद्वारे त्याची वाहतूक केली जात आहे. मुळा नदीच्या आवर्तनाचे पाणी आटताच रासकाई मंदिराभोवताली रात्रभर ट्रॅक्टर सुरु झाल्याने कोठे बुद्रुक, तांगडी, आंबी खालसा या गावांमधील रहिवाशांच्या झोपा उडाल्या आहेत. याबाबतची माहिती मिळताच प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी कारवाईचे आदेशही दिले आहेत.


पठारभागातील मुळानदीचे पात्र म्हणजे वाळू तस्करांसाठी लुटीचे केंद्रच बनले आहे. महसूलमंत्र्यांच्या करड्या आदेशाने महसूल विभागाचे वरीष्ठ अधिकारी याबाबत दक्ष असले तरीही प्रत्यक्ष नद्यांभोवतीच्या सज्जाचे तलाठी कोणती भूमिका बजावतात हे लपून राहिलेले नाही. मध्यंतरी धांदरफळ सज्जाच्या वादग्रस्त तलाठ्याचा कारनामाही चव्हाट्यावर आला होता. त्यातच सध्या देशभरात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने पाटलांच्या आदेशाला मर्यादा आल्या आहेत. त्याचा गैरफायदा घेत तालुक्यातील वाळू तस्कर पुन्हा सक्रिय झाले असून पठारभागात तर दिवसाढवळ्या मुळावर दरोडा सुरु आहे.


कोठे बुद्रुकच्या नदीपात्रालगत असलेल्या रासकाई देवी मंदिराचा परिसर सध्या वाळू तस्करांच्या हालचालींचे केंद्र बनले आहे. मजुरांचा वापर करुन दिवसाढवळ्या वाळू उपसून पात्रातच चाळा करुन त्याचा साठा केला जातो. आश्‍चर्य म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत रासरोज सुरु असलेला हा प्रकार शेकडों ग्रामस्थांना दिसत असला तरीही घारगावचे मंडलाधिकारी व तलाठ्यांच्या दृष्टीस मात्र पडतं नाही. रात्री अंधार पडताच दिवसभर अदृष्य असलेले तस्कर रासकाई मंदिराभोवती गोळा होतात आणि मग सुरु होते दिवसभर साठवलेल्या वाळूची वाहतूक.


गेल्याकाही दिवसांपासून पिंपळगाव खांड धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन सुरु होते. मात्र ते बंद होताच कोठे बुद्रुकसह मुळानदी पात्राभोवती वाळू तस्करांच्या घिरट्या आहेत. कोठे बद्रुकसह आंबीखालसा आणि तांगडीच्या ग्रामस्थांनी तर ट्रॅक्टरच्या आवाजाने झोपा उडाल्याचे सांगत वाळू तस्करीला विरोधही केला. मात्र माजलेल्या वळू प्रमाणे फुकटचा माल सोन्याच्या भावात विकून मिळालेल्या पैशातून पोसलेल्या या मानवी वळूंवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. यावरुन येथील तस्करीला स्थानिक महसूलचे कर्मचारी सामील असल्याचे दिसत असून वरीश्ठ अधिकार्‍यांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.


संगमनेर तालुक्याला लाभलेल्या पाचही नद्या गेल्या दशकभरात वाळू तस्करीचे आगार बनल्या आहेत. तालुक्याला समृद्ध करण्यासाठी सह्याद्रीच्या कणखर दगडधोंड्यांना ओलांडीत धावणार्‍या मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी आणि कस या नद्यांमध्ये कधीकाळी पात्रात खचाखच भरलेली वाळू दिसायची. पात्रातून वाहणारे पाणी इतके नितळ की तळही पाहता यायचा. मात्र या सगळ्या गोष्टी आता इतिहास जमा झाल्या आहेत. बदलत्या अर्थकारणात कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी सगळ्याच राजकीय नेत्यांनी नद्यांचे पात्र आणि डोंगरांना आंदनच दिलं. त्याचा परिणाम गेल्या दशकभरात या नद्यांभोवती वाळू तस्करांच्या अक्षरशः टोळ्या निर्माण झाल्या. अगदी डंपरपासून ते गाढवांपर्यंत मिळेल त्या साधनांनी, सापडेल त्या ठिकाणांहून नद्यांना ओरबाडले गेले.

डोंगरच्या डोंगर पोखरुन क्रशरच्या माध्यमातून पर्यावरणाचीही मोठी लुट झाली. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी आली. तेव्हापासून त्यांनी राज्यातील वाळू तस्करीवर विशेष ‘वॉच’ ठेवला आहे. त्यातही संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी असलेले त्यांचे राजकीय वैरही संगमनेर तालुक्यातील त्यांच्या कठोर भूमिकेतून वेळोवेळी दिसून आले आहे. महसूल खात्याचा पदभार स्वीकारताच संगमनेरातील क्रशर मालकांवर ठोठावलेल्या साडेसातशे कोटीहून अधिक दंडवसुलीच्या नोटीसा हेच दर्शवणार्‍या आहेत. त्यांनी राज्यात राबविलेल्या वाळू धोरणातून सामान्यांना वाळू मिळणे दुरापास्त असून वाळूला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे तस्करांच्या संख्येतही दिवसोंदिवस वाढ होत आहे.


पिंपळगाव खांड धरणातून सुरु असलेले आवर्तन थांबताच कोठे बुद्रुक परिसरात वाळू तस्करांनी अक्षरशः थैमान घातले आहे. दिवसाढवळ्या नदीपात्रातून वाळू काढून पात्रातच त्याचा साठा केला जात आहे. रात्री अंधार पडताच अनेक ट्रॅक्टरद्वारे आंबी खालसा, तांगडी व कोठे गावातून जाणार्‍या रस्त्यांवरुन त्यांची वाहतूक केली जाते. रात्रभर सुरु असलेल्या ट्रॅक्टरच्या आवाजाने या गावांमधील ग्रामस्थांच्या झोपा उडाल्या आहेत, काहींनी या तस्करांना विरोध करण्याचाही प्रयत्न केला. मात्र माजलेल्या वळूप्रमाणे त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने या तस्करीमागे स्थानिक मंडलाधिकारी आणि तलाठ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *