शिर्डी हादरली! सख्ख्या भावाने लहान बहिणीचा केला खून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन भावाला केली अटक


नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. भावाने सख्ख्या बहिणीला राहत्या घरातील बेडरुममध्ये सिमेंटचा पेव्हर ब्लॉकने ठेचून तिची निर्घृण हत्या केली आहे. मंगळवारी (ता.2) संध्याकाळी शिर्डीतील कालिकानागर जवळ असलेल्या मयुरेश्वर कॉलनीत उघडकीस आला आहे. सदर घटनेने शिर्डीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वरी नवनाथ कुलथे (वय 17) असे मयत अल्पवयीन मुलीचे नाव असून याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ श्रूत नवनाथ कुलथे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ आपल्या कर्मचार्‍यांसोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले. मयत मुलीचे आजोबा प्रवीण काशिनाथ वीसपुते (वय 65, रा.कालिकानगर, शिर्डी, ता.राहाता) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी 4.30 ते 6 वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने ज्ञानेश्वरी हिचा सौंदडी बाबा मंदिराजवळ डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून डोक्याचा आणि चेहर्‍याचा चेंदामेंदा करून खून केला आहे.

सदर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारील नागरिकांची चौकशी केला असता पोलिसांना वेगळाच संशय आला. यानंतर पोलिसांना मुलीच्या भावाबद्दल माहिती मिळाली आणि तपासाला वेगळंच वळण लागलं. सदर आरोपीचा शोध घेत असताना येवला ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना पेट्रोलिंग दरम्यान एक संशयित मोटारसायकल स्वार दिसला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या पायाला रक्ताचे डाग होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने सहज आपलं खरं नाव सांगितलं. यानंतर पोलिसांनी त्याला रक्ताच्या डागाबद्दल विचारलं. आरोपी भावाने असं काही उत्तर दिलं की पोलीस अधिकारी हादरूनच गेले. आपण राहत्या घरीच लहान बहिणीशी वाद झाल्याने तिच्या डोक्यात दगड घालून संपवल्याचं त्याने पोलिसांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक केली असून पुढील तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करत आहे.

Visits: 129 Today: 2 Total: 1099204

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *